पुणे : कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार हजार हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या केळी रोपांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीमुळे पुढील वर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रात केळींचा काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे.
जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात प्रामुख्याने रावेर, यावल या तालुक्यात कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर दिसून आला आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ३८०० हेक्टरवरील नव्याने लागण केलेल्या रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कुकुंबर मोझॅकचे विषाणू केळीसह सुमारे नऊशे वनस्पतींवर जिवंत राहू शकतात. शेतकरी रोपांची लागण केली,की आंतरपीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. या भाजीपाल्यामुळे विषाणूचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होतो. शिवाय एकदा प्रादुर्भाव होऊन रोप पिवळे पडले की, ते उपटून टाकून नष्ट करावे लागते. शेतकरी महागडय़ा औषधांची फवारणी करतात, खतांची मात्रा देतात, तरीही ते रोप विषाणुमुक्त होत नाही, उलट विषाणूचा प्रसार वेगाने करते.
रावेर तालुक्यातील प्रयोगशील केळी उत्पादक देवेंद्र राणे म्हणाले,की रावेर तालुक्याच्या उत्तर भागातील केळीच्या बागा पूर्णपणे वाया गेल्या आहेत. कृषी विभागाने जाहीर केलेल्या माहितीपेक्षा जास्त क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सतत एकच पीक घेणे, क्षेत्र जास्त असल्यामुळे विषाणूग्रस्त रोपांकडे दुर्लक्ष होणे आदी कारणांमुळे यंदा जास्त नुकसान झाले आहे. सतत पाऊस राहिल्यामुळे जमिनीत ओल आणि हवेत आद्र्रता कायम राहिल्यामुळे विषाणूचा प्रसार अधिक वेगाने झाला आहे. याचा परिणाम म्हणून निर्यातक्षम केळींच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. नव्याने झालेली लागण वाया गेल्यामुळे पुढील वर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रात केळींचा काही प्रमाणात तुटवडा जाणवू शकतो.
मेअखेर किंवा जूनमध्ये रोपाची लागण झाल्यास कुकुंबर मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव कमी होतो. पण, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे या दोन महिन्यांत लागण झालेल्या रोपांवर विषाणूचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. रावेर तालुक्याच्या उत्तरेकडील भागात केऱ्हाळा, अहिरवाडी, भिकारी, अहमदपूर, ऐनपूर या गावांत जास्त नुकसान आहे. मे, जूनमध्ये रोपांची लागण झाल्यास रोगाचे प्रमाण कमी राहते, पण त्या वेळी रोपांची उपलब्धता कमी असते, पुढील वर्षी रोपवाटिकांनी या बाबतचे नियोजन करावे. जुलै-ऑगस्ट महिन्यात लागण करणे टाळले पाहिजे.
– चंद्रशेखर पुजारी, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव</p>