शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गतवर्षीच्या तुलनेत दिवसाला चौदा लाखांपर्यंत वाढून तो ७० लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झाले आहे. नव्या गाडय़ांच्या खरेदीला झालेला विलंब, जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या गाडय़ांवरील देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च, नादुरुस्त गाडय़ांमुळे संचलनात येत असलेले अडथळे, इंधन दरवाढ आणि आस्थापनेवरील खर्च यामुळे तोटा होत असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जवळपास दहा लाख प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. मात्र पीएमपीच्या निष्क्रिय कारभारामुळे उत्पन्न कमी आणि तोटा जास्त असेच चित्र अलीकडच्या काही वर्षांत पुढे आले आहे. यासंदर्भात पीएमपीला मिळणारे उत्पन्न, खर्च आणि होत असलेला तोटा यासंदर्भात नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेच्या प्रश्नोत्तराद्वारे लेखी विचारणा केली होती. त्यावर पीएमपीने दिलेल्या उत्तरातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

पीएमपीची संचलनातील तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी अर्थसाहाय्य करावे, असा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यानुसार पीएमपी कंपनीची स्थापना झाल्यापासून या दोन्ही महापालिकांनी मिळून आत्तापर्यंत ९५३ कोटी ९३ लाख रुपये संचलनातील तूट भरून काढण्यासाठी दिले आहेत. यामध्ये पुणे महापालिकेचा वाटा हा ५५० कोटी ८२ लाख रुपयांचा असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४०३ कोटी १० लाख रुपये दिले आहेत. दोन्ही महापालिकांकडून तूट भरून काढण्यासाठी अर्थसाहाय्य होत असले तरी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्यामुळे पीएमपीला तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. नव्या गाडय़ांच्या खरेदीची रखडलेली प्रक्रिया, घटती प्रवासी संख्या, आयुर्मान संपुष्टात आलेल्या पण मार्गावर धावणाऱ्या गाडय़ा, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करावा लागणारा मोठा खर्च, इंधनदरवाढ या कारणांचा फटका पीएमपीला बसला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सन २०१७-१८ या वर्षांत दिवसाला १ कोटी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत होते. तर दिवसाचा खर्च हा २ कोटी ३४ लाख रुपये होत होता. दिवसा तोटय़ाचे प्रमाण हे ५६ लाख रुपये असे होते. सन २०१८-१९ या वर्षांतील एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात पीएमपीचे दिवसाचे उत्पन्न १ कोटी ६८ लाख रुपये असून दिवसाचा खर्च २ कोटी ३८ लाख आहे. तर दिवसाला होणारा तोटा ७० लाख रुपये असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्यावर्षी दिवसाला होणारा तोटा ५६ लाख रुपये होता तो चौदा लाखांनी वाढून ७० लाखांवर पोहोचला असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तसेच गतवर्षीपेक्षा उत्पन्न दहा लाखांनी कमी झाले असून खर्चामध्ये दिवसाला चार लाखांची वाढ झाली आहे.