पुणे: राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीने ४ लाख १९ हजार १८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, तिथे २ लाख ४१ हजार ६०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाचा जोर वाढला होता. प्रामुख्याने कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पावसाचा जोर होता. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. त्याचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, नेर, आर्णी, बाबुळगाव, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी, मारेगाव, झरी, कळब, घाटंजी, पुसद, राळेगाव या तालुक्यांतील २,४१,६०३ हेक्टरवरील सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी, भाजीपाला, हळद, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.
यवतमाळखालोखाल बुलडाण्यातील मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामुन तालुक्यांतील १, ५२,४१३ हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर तालुक्यांतील १,४,७०० हेक्टरवरील सोयाबीन आणि तुरीचे नुकसान झाले आहे. चंद्रपूरमधील चंद्रपूर, नागभीड, वरोरा, बल्लारशा तालुक्यांतील ५,७५८ हेक्टरवरील भात, कापूस, सोयाबीन, तुरीची नासाडी झाली आहे.जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये) यवतमाळ २,४१,६०३, बुलढाणा १,५२,४१३, अकोला १,४,७००, चंद्रपूर ५,७५८, भंडारा २,२३५, वर्धा १,६५९, गडचिरोली ४०२, नागपूर १९९, जळगाव १४९, रायगड ४५, रत्नागिरी १७. एकूण नुकसान ४,१९,१८० हेक्टर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोयाबीन, कापूस, कडधान्यांना फटका

यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोलीत प्रामुख्याने सोयाबीन, तूर, उडीद, कापूस, मका, मूग, भात, नागपूरमध्ये संत्रा, मोंसबी, जळगावमध्ये केळी, रायगड, रत्नागिरीत भात, नाचणी, आंबा, फणस, नारळ, सुपारी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

दोन दिवस मुसळधार पुणे : संपूर्ण कोकण किनारपट्टीसह घाटमाथा, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि मराठवाडय़ातील लातूर, नांदेड जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी, रायगडला ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loss of crops on four lakh hectares pune amy
Show comments