खर्चाची उलाढाल शंभर कोटींवर; मोठय़ा आवाजाचा सोस
दणदणाट आणि धिंगाणा अशीच ओळख बनत चाललेल्या गणेशोत्सव मिरवणुकांवर यावर्षी कोटय़वधी रुपयांची उधळण झाली आहे. शहरातील फक्त नोंदणी झालेल्या मंडळांची मिरवणुकीच्या खर्चाची उलाढाल तब्बल शंभर कोटी रुपयांच्या घरात गेली असून बहुतेक मंडळांचा सर्वाधिक खर्च हा डीजे आणि स्पिकर्सवर होत असल्याचेही मिरवणुकीतून दिसून आले.
दोन-दोन दिवस चालणाऱ्या मिरवणुकांच्या वाढलेल्या प्रस्थाबरोबरच मिरवणुकांवर करण्यात येणाऱ्या खर्चाचे आकडेही फुगत चालले आहेत. वाढत चाललेले दर यांबरोबरच वाढत्या हौशीनेही मिरवणुकांवरील खर्च कोटय़वधीच्या घरात पोहोचवला आहे. शहरातील फक्त नोंदणी झालेल्या मंडळांच्या मिरवणुकीच्या खर्चावरील उलाढाल जवळपास शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारी आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता अशा मुख्य रस्त्यांवरील मिरवणुकीत सहभागी असलेल्या मंडळांबरोबरच उपनगरातील मंडळेही मिरवणुकीवर लाखो रुपये उधळत आहेत. मोठ्ठा आवाज आणि दणदणाटाच्या वेडाने मंडळांचा मिरवणुकीचा खर्च वाढवला आहे. काही वर्षांपूर्वी सजावटीवर किंवा रथावर खर्च करण्यासाठी मंडळांकडून प्राधान्य दिले जात होते. आता मात्र सजावट साधी ठेवून स्पिकर्सच्या भिंती उभारण्यावर अधिक खर्च केला जात आहे. सध्या डीजेचा एका मिरवणुकीचा खर्च हा साधारण ५० हजार ते दोन लाख रुपये होता.
ढोल पथकांकडून डीजेकडे
स्पिकर्सच्या भिंती, डीजे आणि त्यावर केले जाणारे अंगविक्षेप यांपासून विसर्जन मिरवणुका दूर व्हाव्यात. यासाठी ढोल-ताशा पथकांची चळवळच पुण्यात उभी राहिली. गेली काही वर्षे ही पथके पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरली आहेत. मात्र आता पथकांमधील नावीन्य हरवत चालले आहे आणि या पथकांकडून पुन्हा एकदा डीजेच्या दणदणाटाकडे पुणेकरांचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. डीजे असलेल्या मिरवणुका रात्री १२ नंतर थांबवल्या जात असल्या तरीही मंडळांचा स्पिकर्सच्या भिंती उभ्या करण्याकडेच ओढा असल्याचे दिसत आहे.
जिवंत देखाव्यांना पसंती
मिरवणुकीत पथक आणि डीजेबरोबर जिवंत देखाव्यांनाही मंडळे पसंती देत आहेत. त्याचबरोबर मिरवणुकीत नृत्य करणारे गट, कसरती, मल्लखांब यांच्या प्रात्यक्षिकांची पथकेही ठेवण्यात आली होती. वेगळे काहीतरी पाहायला मिळत असल्यामुळे या मंडळाकडे गर्दीचेही लक्ष वेधले जात होते.
प्रत्येक घटकासाठी दौलतजादा
- ट्रॅक्टर – १५ हजार रुपये
- ट्रॅक्टरच्या हौद्यावर पहाड बांधणे (फळ्या बांधणे) – २० ते २५ हजार रुपये
- जनरेटर – ३० ते ३५ हजार रुपये
- फुलांची सजावट – २५ हजार ते अडीच लाख रुपये
- तयार सेट – ३० हजार ते २ लाख रुपये (मोठय़ा मंडळांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष सजावटीचा खर्च अधिक असतो)
- रोषणाई, एलईडी बीम लाईट्स – ५० हजार ते ३ लाख रुपये
- देखाव्यावर लावण्यात आलेले हॅलोजन दिवे – २५ हजार रुपये
- ढोल पथक – २० ते ६० हजार रुपये
- बँड पथक – २५ ते ३० हजार रुपये
- डीजे – ३० हजारे ते ३ लाख.
खर्चाचे गणित
मिरवणुकीमध्ये रथ उभारण्यात येणारा ट्रॅक्टर, त्याचा हौदा, त्यावर उभारण्यात येणारा पहाड, त्यावर फुलांची सजावट किंवा देखावा, रोषणाई, बीम लाईट्स, डीजे, स्पिकर्स, जनरेटर, ढोल किंवा बँड पथक असे खर्चाचे घटक आहेत. सगळीच मंडळे हा जामानिमा करत नाहीत. मात्र डीजे, एखादे पथक, जनरेटर, फुलांची सजावट किंवा सेट, ट्रॅक्टर हा खर्च प्रत्येक मंडळ करते. लहान मंडळांचा खर्चही दीड ते चार लाख रुपये होतो. अनेक मंडळे दोन पथके किंवा एक पथक आणि डीजे ठेवतात. मात्र भव्य सेट, सजावट करणारी मोठी मंडळेही दहा लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक खर्च करतात. लहान, मध्यम, मोठी अशी मिळून साधारण साडेतीन हजार मंडळे आहेत. त्यांचा सरासरी खर्च तीन लाख रुपये धरला तर एकूण उलाढाल ही १०५ कोटी रुपयांच्या घरात जाते.