पिंपरी चिंचवड: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुसऱ्या कोणाशी विवाह करायचा नाही. तू माझ्या सोबत येऊन रहा अन्यथा पोलिसांत जाऊन तक्रार करेन अशी धमकी आरोपी विवाहित महिलेने प्रियकर विकास विलास माळवे (वय-२७) याला दिली. आत्महत्येपूर्वी विकासने सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यात संबंधित महिला जाच करत असल्याचा उल्लेख केला असल्याचे वाकड पोलिसांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रियकर विकास आणि ३३ वर्षीय आरोपी महिलेचे गेल्या एक वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते. आरोपी महिलेचा पती मुंबईत असतो. तो पत्नीसोबत राहत नाही. महिलेला दोन मुलीदेखील आहेत अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान, विकास छोटा व्यवसाय करून त्याचे घर चालवत होता. मात्र, आरोपी महिला तिचा संसार चालविण्यासाठी पैसे मागायची तसेच, इतर कोणाशी विवाह केलास तर मी तुझी पोलिसांत तक्रार करेन. त्यामुळे तू माझ्या सोबत येऊन रहा अशी धमकी देत होती. याच मानसिक जाचाला कंटाळून विकासने तीन दिवसांपूर्वी सकाळी साडेआठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.