पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार ओयो हॉटेल टाऊन येथे घडला आहे. या प्रकरणी मयत तरुणीचे वडील अशोक नारायण गवारे यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. हेमंत अशोक मोहिते (वय २९) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सपना अशोक गवारे (वय २७) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. हेमंतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. मृत प्रेयसी सपना आणि हेमंत मूळ वाशी उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.

“विवाहाला नकार दिल्यानं प्रियकराकडून हत्या”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि हेमंतचे एकमेकांवर प्रेम होते. ते पिंपरी-चिंचवडमध्ये २ दिवसांपूर्वी ओयो हॉटेल टाऊन येथे राहण्यास आले होते. रूम नंबर ३०१ मध्ये दोघे जण थांबले होते. दरम्यान, हेमंत हा सपनाकडे विवाह करण्यास तगादा लावत होता. त्याला सपनाने नकार दिला होता. याच रागातून हेमंतने बाथरूमध्ये सपनाचा स्कार्फने गळा दाबून खून केला. त्यानंतर घाबरलेल्या हेमंतने प्रेयसीने आत्महत्या केली आहे असा बनाव रचला.

“शवविच्छेदन अहवालामुळे आत्महत्येचा बनाव उघड”

घटनेनंतर सपनाला तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळला असल्याचं निष्पन्न झाले. तसेच, घटनास्थळी झटापटीत बाथरूमची खिडकी फुटलेली होती. एकूणच घटनास्थळ आणि ते राहात असलेली रूम पाहता तिचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. अखेर शवविच्छेदन अहवालात पोलिसांचा संशय खरा ठरला. हेमंतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार हे करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lover murder girlfriend in pimpri chinchwad pune due to rejection pbs