पुण्यातील मध्य वस्तीतील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेरील वाहनतळामध्ये ठेवलेल्या दुचाकीजवळ गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाल्याने तीन जण जखमी झाले. फरासखाना पोलीस ठाण्याबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या एका दुचाकीजवळ हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता कमी असली, तरी स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी दिली. पोलिसांकडून घातपातासह सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे. स्फोट झाल्याचे समजताच घटनास्थळी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एटीएसच्या पथकाने धाव घेतली. तसेच बॉम्बशोधक पथकसुद्धा या ठिकाणी दाखल झाले असून स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई पोलीसांचे दहशतवादविरोधी पथकही पुण्याकडे रवाना झाले आहे. स्फोटामुळे नुकसान झालेली दुचाकी साताऱयातून चोरून आणलेली असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. घटनास्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे.
(छायाचित्र – एएनआय)
पुण्यात फरासखान पोलीस ठाण्याजवळ स्फोट; तीन जखमी
पुण्यातील मध्य वस्तीतील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेरील वाहनतळामध्ये ठेवलेल्या दुचाकीजवळ गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाल्याने तीन जण जखमी झाले.
First published on: 10-07-2014 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low intensity explosion in pune three injured