पुणे : देशात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, देशभरात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, देशात मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत किनारपट्ट्यांचा परिसर, ईशान्य भारतातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
देशात या दोन महिन्यांत सरासरी ४२२.८ मिमी पाऊस होतो, त्यापैकी सुमारे ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने मध्य भारतात कमी पावसाची शक्यता आहे. या काळात प्रशांत महासागरात सक्रिय असलेला एन-निनो अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सध्याच्या तटस्थ स्थितीतून सकारात्मक स्थितीत जाण्याची शक्यता आहे. देशभरात या काळात तापमानही सरासरीपेक्षा काहीसे जास्तच राहण्याचा अंदाज आहे.
जुलैमध्ये १३ टक्के अधिक पाऊस
देशात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यात सरासरी २८०.५ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ३१५.९ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. उत्तर भारतात सरासरी २०९.७ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २६१.४ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा २५ टक्के जास्त पाऊस झाला आहे. ईशान्य भारतात सरासरी ४२४.१ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २८६.८ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. मध्य भारतात ३२१.३ मिमी पाऊस पडतो, त्याऐवजी ३९१.४ म्हणजे २२ टक्के जास्त, दक्षिण भारतात सरासरी २०४.५ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २९५.५ मिमी म्हणजे ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. देशात एक जून ते ३१ जुलै या काळात सरासरी ४४५.८ मिमी पाऊस पडतो. मात्र, ४६७ मिमी म्हणजे पाच टक्के जास्त पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.