ठाणे, पुणे : टोमॅटोच्या दरात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दिलासा मिळाल्यानंतर किरकोळ बाजारात दर पुन्हा ६० रुपये किलोवर गेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण या भाज्यांचे दरही किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वधारले आहेत.
पुणे, नाशिक, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतून मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील बाजारपेठेत भाज्यांची आवक होते. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक ५ ते १० टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रतिकिलो २ ते १२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण भाज्यांचा समावेश आहे. किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर १० ते २० रुपयांनी वधारले असून, या सर्व भाज्या किलोमागे ६० ते ८० रुपयांवर पोहोचल्या आहेत.
हेही वाचा >>> भाजप नव्हे, ‘भारता’साठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची – फडणवीस यांचे वक्तव्य
जून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापर्यंत टोमॅटोचे दर तेजीत राहिल्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात टोमॅटोची चांगली लागवड झाली होती. आता सप्टेंबरपूर्वी झालेल्या लागवडीपासून टोमॅटो मिळणे कमी झाले आहे. बाजारांमध्ये आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे.
टोमॅटो दरातील चढ-उतार
(प्रति किलो दर रुपयांत)
मे ३०
जून ८०-१००
जुलै १८०-२००
ऑगस्ट मध्य १६०-२००
ऑगस्टअखेर ८०-१२०
सप्टेंबर २०-३०
ऑक्टोबर २५-३५
२२ नोव्हेंबर ५० ते ६०
लागवडीत मोठी घट
राज्यात रब्बी हंगामात सरासरी २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड होते. यंदा २० नोव्हेंबपर्यंत १६९० हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली असून, महिन्याअखेर आणखी काही लागवड गृहीत धरली तरी मोठी घट नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात नगरमध्ये ४२१, पुण्यात ३२०, सोलापूर ९४९ आणि साताऱ्यात ५७९ हेक्टरवर लागवड झाली आहे. नाशिक परिसरात खरिपातील लागवड काढल्यानंतर लागवडी सुरू होतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली. रोपवाटिकातील टोमॅटो रोपांच्या मागणीत ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे बारामती कृषी विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे यांनी सांगितले.
नारायणगाव, नाशिक, सातारा, सोलापूरसह राज्याच्या अन्य भागांतील टोमॅटो उत्पादनात घट झाली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तेलंगणातून होणारी आवक बंद झाली आहे. सध्या नाशिकमधून आवक सुरू आहे. डिसेबरअखेर दर तेजीत राहील, त्यानंतर रब्बी हंगामातील टोमॅटो बाजारात आल्यानंतर दर आवाक्यात येतील.
– शंकर पिंगळे, भाजीपाला व्यापारी, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती.