लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदानाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत होत आहे. पहिल्या चार तासात ११.४६ टक्के मतदान झाले आहे. पिंपरीत झोपडपट्टीबहुल भाग असल्याने दुपारनंतर मतदानाला गर्दी होण्याची शक्यता आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत होणार आहे. एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या परिसराचा समावेश असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असलेल्या या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दोनदा राष्ट्रवादी आणि एकदा शिवसेनेने बाजी मारली. २००९ आणि २०१९ मध्ये अण्णा बनसोडे तर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये केवळ पिंपरीची एकमेव जागा मिळाली आहे.

आणखी वाचा-पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा

या मतदारसंघातील आकुर्डी, निगडी, प्राधिकरण या उच्चभ्रू भागातील मतदार हा भाजपचा पाठीराखा असल्याचे मानले जाते. हा मतदार कोणाच्या पाठीशी राहतो, यावर बरीच गणिते अवलंबून असतील. या मतदारसंघात झोपडपट्टीबहुल भाग सर्वाधिक असून हा मतदार निर्णायक ठरणार आहे. एकूण ३,९१,६०७ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २,०४,००५, महिला मतदार १,८७,५६८ आणि तृतीयपंथी ३४ मतदार आहेत.