इंदापूर : यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरलेले उजनी धरण गेल्या दोन महिन्यांतील बेसुमार पाणी वापराने अर्धे रिकामे झाले असून  कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठा आज पन्नास टक्कयांवर  आला आहे. अशा पद्धतीने बेसुमार पाणी वापरल्यास उजनीच्या पाण्याचा ऐन उन्हाळ्यातच “उन्हाळा” होण्याची दाट शक्यता आहे.

सध्या उजनी मध्ये केवळ सव्वीस टीएमसी पाणी चलसाठ्यात असून उन्हाळ्याच्या तोंडावर उजनीवर अवलंबून असलेले  पाणलोट क्षेत्रातील शेतकरी उजनीच्या पाण्याच्या झळा आत्तापासूनच अनुभवत आहेत. याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर ,लवकरच  धरण मोकळे होण्याची भीती व्यक्त होत आहे.ऐन उन्हाळ्यात  उजनीच्या पाण्याचा उन्हाळा होऊ लागल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.उजनीच्या पाण्याचा बेसुमार वापर थांबवावा. अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली असून आमच्या शेतीच्या उपसा सिंचन योजना व पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांचा विचार करून आता तरी उर्वरित पाण्याचे फेरनियोजन करा .अशी मागणी उजनी धरणग्रस्थ  शेतकऱ्यांतून पुढे आली असून पाणलोट क्षेत्रातील लोकप्रतिनिधी उजनीच्या पाण्याबाबत गप्प का ? असा सवाल विचारला जात आहे.

यावर्षीच्या आगामी उन्हाळ्याची दाहकता वेळीच ओळखून , आहे ह्या पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास मोठ्या गंभीर समस्येला  तोंड द्यावे लागणार आहे .याचे चित्र आता स्पष्ट दिसत आहे.सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा सांगोला व भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजना साठी उजनीतून भीमा नदीत आवर्तन सोडले जाते. एका आवर्तनाला सुमारे साडेपाच टीएमसी पाणी लागते .अशा प्रकारची दोन आवर्तने सोडली जातात. यामध्ये बारा टीएमसी पाणी नदीपात्रातून सोडले जाते .ही फार मोठी शोकांतिका आहे.

सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून समांतर जलवाहिनीचे काम गेले कित्येक दिवस सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास आले नसल्याने उजनीच्या पाण्याचा फार मोठा अपव्यय होत आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस पडला तरच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरते. अन्यथा अनेक वेळा उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकत नाही.पवसाने ओढ दिली तर आषाढी एकादशीला पंढरपूरला उजनीतून पाणी सोडावे लागते. असे अनेक वेळा घडले असून हे अनुभव पदरी असताना त्या दृष्टीने पाण्याचे नियोजन होत नाही. असा आरोप उजनी धरणग्रस्तांमधून सातत्याने होत आहे.गतवर्षी उजनी धरण ६० टक्के भरले होते .मात्र बेसुमार पाणी वापराची सवय लागल्याने ते पाणी पुरले नाही. मृत साठ्यातीलही साठ टक्के पाण्याचा वापर होऊन उजनी धरणाच्या गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासातील पाणीसाठ्याची निच्यांकी पातळीची नोंद झाली होती.

या आठवणी ताज्या असताना सुद्धा उजनीच्या पाण्याचा बेसुमार वापर होत आहे .हा पाण्याचा वापर वेळीच रोखून उजनी धरणग्रस्तांच्या उपसा जलसिंचन योजनांना आठमाही ऐवजी बारमाही  पाणी नियोजन करावे. अशी मागणी होत आहे.आता  उजनीच्या पाण्याचा सुरुवातीपासूनच मोठा वापर सुरू झाला असल्याने दुष्काळाच्या खाईत उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लोकांची वणवण लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. नीरा- भीमा नदी  जोड प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पुन्हा उजनीच्या पाण्याचा वापर वाढणार आहे.उजनीतील गाळ काढल्यास  चार टीएमसी पाण्याची साठवण क्षमता वाढेल ,असे जाणकारांचे मत आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नदी किनारी मोठ्या प्रमाणात शेतीच्या उपयुक्त माती आहे. गेले अनेक वर्षे शेतकरी ही माती उचलून माळरानाची शेती गाळमाती भरून तयार करीत होते. यातूनच धरणाच्या पाण्याची साठवण क्षमता वाढण्यासाठी मदतच होत होती.मात्र आता शासनाने नव्याने” गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार” ही योजना आणली आहे.उजनी धरण पाणलोट क्षेत्रात या योजनेला गती आली तर , उजनीच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होणार आहे. याशिवाय उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा साठा उपलब्ध आहे. वाळू माफिया सातत्याने या वाळूचा उपसा करत असतात .

मात्र, शासनाने तातडीने उजनीतील वाळूच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. उजनीतील वाळू साठा मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर काढल्यानंतर  उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

Story img Loader