नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यानुसार महाविद्यालयीन पातळीवर निवडणुकांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद नियुक्त करण्याच्या तरतुदीमुळे प्राचार्य धास्तावले आहेत. विद्यार्थी निवडणुकांमुळे महाविद्यालयांत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होईल, अशी भीती प्राचार्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या असलेली विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्याची पद्धत योग्य असल्याचे मतही प्राचार्याकडून मांडले जात आहे.
नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यात विद्यार्थ्यांच्या निवडणुकांची तरतूद आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्गातील आदल्यावर्षीच्या पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची वर्गप्रतिनिधी म्हणून नेमणूक केली जाते. या वर्गप्रतिनिधींचे मतदान घेऊन त्या माध्यमातून महाविद्यालयाची विद्यार्थी परिषद नेमली जाते. विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांमधून विद्यापीठ प्रतिनिधीची नेमणूक केली जाते. आता या पद्धतीत बदल करून महाविद्यालयाच्या पातळीवर निवडणुका घेऊन त्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेची नियुक्ती करण्याबाबत तरतूद आहे. या निवडणुकांचे स्वरूप कसे असेल याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी महाविद्यालयाच्या पातळीवर निवडणुका घेण्याच्या निर्णयाला प्राचार्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भूमिका प्राचार्य घेत आहेत. त्याचप्रमाणे ‘मुळातच वर्षभर शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, असे असताना निवडणुकांमुळे वर्षभराचे वेळापत्रक जमवणे कठीण असल्याचे मत प्राचार्यानी व्यक्त केले आहे. ‘सध्या एका खासगी संस्थेकडून महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या निवडणुकांवरून विद्यार्थी निवडणुका घेणे सोपे नाही याची कल्पना आलेली आहे. या संस्थेच्या निवडणुकांमुळे महाविद्यालयाच्या नियमित कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत,’ असे एका प्राचार्यानी सांगितले.
याबाबत प्राचार्य महासंघाचे नंदकुमार निकम यांनी सांगितले, ‘महाविद्यालयीन निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत आताच्या मसुद्यानुसार काहीच स्पष्टता नाही. मात्र थेट विद्यार्थी निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे फक्त निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीही काहीजण प्रवेश घेतील. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, संघटनांचा महाविद्यालयात थेट शिरकाव होणेही शैक्षणिकदृष्टया हिताचे नाही.’ याबाबत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता म्हणाले ,‘निवडणुका होण्यास हरकत नाही. पण त्यापासून राजकीय संघटना दूर राहाव्यात आणि त्या पूर्णपणे विद्यार्थ्यांच्याच राहतील याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यामागचा हेतू साध्य होण्याची शक्यता नाही.’ फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, ‘विद्यार्थी परिषद निवडण्याची सध्याची प्रक्रियाही चांगली आहे. गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळते आहे. थेट निवडणुकांमुळे महाविद्यालयाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा