शहरातील वाहने मोठय़ा प्रमाणावर सीएनजी इंधनावर परावर्तीत होत असताना सीएनजीचा पुरवठा अपुरा असल्याने निर्माण होणारी समस्या येत्या काही दिवसात हद्दपार होणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड कंपनीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजीचे तब्बल ९० नवे पंप सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांलगत जागा व वितरक मिळविण्यासाठी जाहीर सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्या एलपीजी उपलब्ध असणाऱ्या विविध पंपांवर सीएनजी उपलब्ध करून देण्याची योजनाही सुरू करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भुरेलाल समितीच्या अहवालानंतर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने शहरात सुरुवातीला रिक्षांना सीएनजी किंवा एलपीजीची सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती करून आता आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. शहरामध्ये ४५ हजाराहून अधिक रिक्षा आहेत. त्यातील ९५ टक्के रिक्षा सध्या सीएनजी इंधनावर परावर्तीत करण्यात आल्या आहेत. पेट्रोलपेक्षा सीएनजी इंधन स्वस्त असल्याने इतर वाहनेही सीएनजीवर परावर्तीत करण्याकडे वाहनचालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे सीएनजी पंपांची संख्या कमी असल्याने सीएनजी मिळविण्यासाठी पंपावरील रांगेत काही तास थांबावे लागत होते. रिक्षा पंचायतीच्या वतीने या प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नावर बैठक घेतली होती. सद्यस्थितीत सीएनजीच्या ऑनलाईन पंपांसह शहरात सुमारे २५ पंप आहेत. त्यामुळे पुरवठय़ाची स्थिती काहीशी सुधारली असली, तरी ही समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही. सीएनजीचे प्रस्तावित नवीन पंप सुरू झाल्यास सीएनजी पुरवठय़ाची समस्या कायमची दूर होऊ शकणार आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने मुंढवा- खराडी, मुंढवा- हडपसर, हडपसर- मांजरी, विश्रांतवाडी, संगमवाडी रस्ता, कात्रज- स्वारगेट, वानवडी- फातिमानगर, बंडगार्डन रस्ता, शास्त्री रस्ता, धायरी- चांदणी चौक, पौड रस्ता, डेक्कन, सेनापती बापट रस्ता, पाषाण रस्ता, शंकरशेठ रस्ता, फग्र्युसन रस्ता, वारजे माळवाडी, मॉडेल कॉलनी, गणेशखिंड रस्ता, टिळक रस्ता, विद्यापीठ- बालेवाडी, औंध, बोपोडी, बोपोडी- नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, डांगे चौक, वाकड, नाशिक रस्ता, हिंजवडी आदी भागांमध्ये सीएनजीचे वितरक नेमण्याचे नियोजन केले आहे. या भागामध्ये भाडेतत्त्वावर जागा मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा