मोबाइल कंपन्यांबाबत दिलेल्या पोर्टेबिलिटीनुसार एलपीजीच्या ग्राहकांनाही गॅस कंपनी बदलता येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री लक्ष्मी पनाबाका यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली.
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलपीजी डिस्ट्रिब्युटर्सच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य पातळीवरील एलपीजी वितरकांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन पनाबाका यांच्या हस्ते झाले. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित, खासदार रजनी पाटील, परिषदेच्या आयोजक व महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा उषा पूनावाला तसेच चंद्रप्रकाश, विजय भावे, शैलेश जैन, पी. एन. शेठ आदी संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
गॅस कंपन्यांच्या पोर्टेबिलिटीबाबत पनाबाका म्हणाल्या, ग्राहकांना चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. एलपीजीच्या ग्राहकांना त्यांची गॅस कंपनी बदलता येईल, अशी योजना तयार करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर चंदीगडमध्ये सुरू करण्यात आला आहे. कंपनीबरोबरच एकाच कंपनीचे वितरकही ग्राहकांना बदलता येणार आहे.
कार्यक्रमात पनाबाका यांनी गॅस वितरकांना येणाऱ्या विविध समस्या जाणून घेतल्या. संघटनेशी चर्चा करून विविध समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमसाठी इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे राज्यभरातील सुमारे तीनशे वितरक, प्रतिनिधी त्याचप्रमाणे राज्य शासनाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. परिषदेत संघटनात्मक विषय व ग्राहकसेवेशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा करण्यात येणार आहे.