लिसर्जिक अॅसिड डायएथिलामाईड (एलएसडी) हा द्रव स्वरुपातील महागडा अमली पदार्थ गोव्यामधून पुण्यात विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल दीड कोटी रुपये इतकी आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षांमध्ये केलेली ही सर्वात मोठी कामगिरी आहे. अटक आरोपींना दोन दिवस पोलस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
टॅरेन्स फिरदोस मेहता (वय ३०, रा. बी. टी. कवडे रस्ता, मुंढवा) व यश अविनाश जोगळेकर (वय २९, रा. श्रीनिकेत अपार्टमेंट, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोवा येथून अमली पदार्थ घेऊन त्याची पुण्यात विक्री केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले.
मेहता याच्याकडून ९० मिली लीटर एलएसडी, ४० ग्रॅम चरस, एलएसडी ड्रॉप टाकलेल्या २० पांढऱ्या वडय़ा, डिजिटल वजनकाटा व रोख २७ हजार ६०० रुपये जप्त केले. जोगळेकर याच्याकडून एलएसडी ड्रॉप टाकलेल्या १४ पांढऱ्या वडय़ा व सात मिली लीटर एलएसडी जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी हे बारावीपर्यंत शिकले आहेत. दोघेही अविवाहित असून, ते पूर्वी जेट एअरवेजमध्ये कामाला होते. मात्र, तांत्रिक कारणाकरून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. हे काम सुटल्यानंतर जोगळेकर एका नामांकित कंपनीत काम करीत होता. पण, ही नोकरीही त्याने सोडली होती. मेहता याने नोकरी सुटल्यानंतर आईस्क्रीम पार्लर चालविण्यासाठी घेतले होते.
दोघेही आरोपी गोव्यामधून अमली पदार्थ आणून त्याची पुण्यात विक्री करीत होते. वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक अजय वाघमारे, कर्मचारी अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, राकेश गुजर, रामदास जाधव, कुणाल माने, रामचंद्र यादव, प्रफुल्ल साबळे, राजेंद्र बारशिंगे, विठ्ठल खिलारे, नितीन सानप, सचिन चंदन व संगीता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा