जनावरांना होणारा लम्पी चर्मरोग जिल्ह्यात नियंत्रणात आला आहे. लसीकरणासह विविध उपाययोजना केल्याने लम्पी बाधित जनावरांची संख्या कमी झाली आहे.जिल्ह्यात पशुधनातील लम्पी रोग आढळून येताच जिल्हा प्रशासनाकडून लम्पी संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी-विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तत्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लम्पीबाबत उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे पाच चमू बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १६३ गावांतील ४२२३ जनावरे लम्पीने बाधित झाली होती. तातडीने आठ लाख २८ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात लम्पीबाधित ८२७ जनावरे आहेत.

हेही वाचा >>>पुणे : कासारवाडीतील रेल्वे फाटक पाच दिवस बंद

बाधित जनावरांपैकी ३१४५ जनावरे बरी झाली असून १८४ मृत झाली आहेत. सक्रिय (बाधित) जनावरांपैकी ६४ गंभीर आजारी आहेत. लम्पीमुळे मृत्यू झालेल्या १२८ जनावरांच्या मालकांना ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली. इंदापूर, बारामती आणि खेड तालुक्यातील काही भाग लम्पी प्रादुर्भावाची केंद्रे ठरली होती. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ११७२ जनावरे, बारामती ६८३, खेड ६७४, जुन्नर ३६३, दौंड ३२४, हवेली २७८, शिरूर २७१, मावळ १५९, पुरंदर १२२, आंबेगाव १०१, मुळशी ६१, भोर १४ तर वेल्ह्यामध्ये एक जनावर लम्पीने बाधित झाले होते, असेही विधाटे यांनी सांगितले.

Story img Loader