घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याच्या आमिषाने चोरट्यांनी एकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुयोग रवींद्र आढाव (वय ३२, रा. धानोरी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आढाव यांच्या मोबाईल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. मोबाईल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांकडून करण्यात आली. घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविल्यास १५ लाख रुपये अनामत रक्कम देऊ तसेच दरमहा १२ हजार रुपये भाडे देण्यात येईल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्राची मागणी केली.
मोबाईल मनोरा बसविण्यासाठी सुरुवातीला मोबाईल कंपनीकडे काही शुल्क जमा करावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. आढाव यांना तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी ॲपद्वारे चोरट्यांच्या खात्यात २७ हजार ४६० रुपये जमा केले. चोरट्यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.