बारामती : पत्रातून वेगळया भावना शब्दांद्वारे कागदावर लिहून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविल्या जात होत्या, काळाच्या ओघात पत्रलेखनच लुप्त झाले असून मोबाईलच्या वापरामुळे मेसेजच्या माध्यमातून पोहोचविल्या जाणा-या भावनांमध्ये तितका ओलावा नाही, अशा भावना लेखक, गीतकार अरविंद जगताप यांनी व्यक्त केल्या .

बारामती येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली” प्रतिबिंब व्याख्यानमालेअंतर्गत” रविवारी (ता. २३ )” पत्रास कारण की…”! या विषयावर श्री.जगताप यांनी बारामतीकरांशी संवाद साधला.

जगताप म्हणाले,” पूर्वी पत्र पाठवायचे तेव्हा त्यात केवळ शब्दच नसायचे तर त्यात समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना असत. नात्यांबद्दलची ओढ व मनातील गोष्टींचा उहापोह त्या पत्राद्वारे केलेला असायचा,हल्ली मेसेज टाईप करुन लगेचच ते डिलीट केले जातात, त्यात मायेचा ओलावा अजिबात नसतो. मोबाईल आल्यानंतर भावनाच हरवून गेल्याप्रमाणे झाले असून संवादही संपत चालला आहे,आभासी संवादापेक्षा पत्ररुपी संवाद अधिक प्रभावी असे, मोबाईलमुळे नात्यातील जिवंतपणा कुठेतरी हरवला आहे. मोबाईल व्हायब्रेट होतो मात्र पत्रातील शब्द हे माणसाच्या मनात धडधड निर्माण करीत असत.

अनेकदा निराशा येते, मी एकट्याने काय करु शकेन असे वाटते, अशा वेळी प्रेरणादायी कथा आठवाव्यात, मुंबईतील नळदुरुस्ती करुन करोडो लिटर पाणी वाचवणार्‍या अबीद सुरती, एकट्याच्या प्रयत्नातून विस्थापित केलं जाणारं तैवानमधील गाव वाचवून एक पर्यटनस्थळ बनविणारी व्यक्ती, बॉंबच्या कव्हरमध्ये माती घालत फुल झाडे फुलविणारी एक ज्येष्ठ महिला अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिली.

पती पत्नीच्या नात्याबाबत विवेचन करणारे एक सुंदर पत्रही त्यांनी शेवटी वाचून दाखविले. बारामतीकर रसिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारामतीच्या माजी नगराध्यक्षा मंगल शहा सराफ, फोरमचे सदस्य सुरेंद्र भोईटे व राजेंद्र धुमाळ यांनी अरविंद जगताप यांचा सत्कार केला.

Story img Loader