पुणे विद्यापीठाची एम.कॉम.ची परीक्षा आणि सीएसची परीक्षा एकाच दिवशी येत असून वाणिज्य शाखेच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या वेळापत्रकाचा विचार न करता विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याचे परिणाम आता विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत.
‘आयसीडब्ल्यूए’ची परीक्षा आणि पुणे विद्यापीठाची एम.कॉम.ची परीक्षा एकत्र येत असल्यामुळे पुणे विद्यापीठाने एम.कॉम.च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक शनिवारी जाहीर केले. मात्र, आता हे सुधारित वेळापत्रक आणि आयसीएआय (सीएस) ची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे नवा गोंधळ झाला आहे. एम.कॉम. करतानाच सीएस, आयसीडब्ल्यूए अशा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे विद्यापीठाने वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल करावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
जुन्या वेळापत्रकानुसार पुणे विद्यापीठाची एम.कॉम.ची पहिल्या आणि तिसऱ्या सत्राची परीक्षा ९ ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार होती. मात्र, १० ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये आयसीडब्ल्यूएची परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने एम.कॉमची परीक्षा पुढे ढकलून शनिवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. मात्र, आता ‘सीएस’ची परीक्षा आणि एम.कॉम.ची परीक्षा एकत्र येत आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १८ ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये एम.कॉम.ची परीक्षा होणार आहे, तर सीएसची परीक्षा २० ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने वेळापत्रक सुधारित करूनही विद्यार्थ्यांचा गोंधळ तसाच आहे.

‘‘आयसीडब्ल्यूएची परीक्षा आणि एम.कॉम.ची परीक्षा एकत्र येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यानंतर वेळापत्रक बदलण्यात आले होते. मात्र, आता सीएसची परीक्षाही त्याच दरम्यान असल्याचे कळते आहे. याबाबत वेळापत्रक बदलण्याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकासान होऊ दिले जाणार नाही.’’
– डॉ. सुधाकर जाधवर, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ

Story img Loader