गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे नि:स्पृहपणे काम करणारे, दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडणारे अमर साबळे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कष्टाची व पक्षनिष्ठेची दखल घेऊनच त्यांना नेतृत्वाने खासदारकीची संधी दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दापोडीत सांगितले.
दापोडीत कोहली टॉवर्स येथील साबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,‘भाजपच्या प्रत्यक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात संपर्क कार्यालय उघडले पाहिजे. जनसंपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर तेथे नागरिकांना भेटले पाहिजे. त्यांचे प्रश्न, समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा या कार्यालयांच्या माध्यमातून झाला पाहिजे.’
प्रास्ताविक अमर साबळे यांनी केले. सूत्रसंचालन उमा खापरे यांनी केले. सदाशिव खाडे यांनी आभार मानले.

Story img Loader