पुणे : कोथरुडमध्ये संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गज्या मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यन्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. गज्या मारणेसह साथीदारांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत अशून, ते वापरत असलेल्य वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमात कोथरूडमधील संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना बुधवारी सायंकाळी मारणे टाेळीतील गुंडांनी मारहाण केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी आरोपीविरुद्ध मारहाणीचा कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सुरुवातीला पोलिसांनी कारवाई करताना किरकोळ मारहणीचा गुन्हा दाखल केला होता, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोथरुडमधील मारणे टोळीची दहशत मोडीत काढणार असून, त्यादृष्टीने कारवाई करण्यात येत असल्याचे पत्रकारंशी बोलताना सांगितले.
कोथरूडमधील भेलकेनगर परिसरात १९ फेब्रुवारी दुचाकीस्वार संगणक अभियंता राहुल जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश कोथरूड पोलिसांना दिले होते. पाेलिसांनी मारणे टोळीतील गुंड ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१) अमोल विनायक तापकीर (वय ३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार पसार झाला आहे. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग ( वय ३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड ) यांनी याबाबत फिर्याद दिली.
गज्या मारणेही आरोपी
संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. टोळीप्रमुख गज्या मारणे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून, पोलिसांनी मारणेच्या पौड रस्त्यावरील मारणेच्या घराची झडती घेतली. गुन्हे शाखेच्या पथकाकडून ७४ ठिकाणी झडती घेण्यात आली. मारणे याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाईसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे, असे पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
दहशत मोडीत काढण्यासाठी तक्रार करा
कोथरूड परिसरातील गज्या मारणे टोळीची दहशत मोडीत काढण्यात येणार आहे. नागरिकांनी मारणे टोळीविरुद्ध तक्रार करावी. त्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे या कक्षाची जबाबादरी सांभाळणार आहेत. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
गुंडांनी मुख्य प्रवाहात यावे. चांगली वर्तणूक ठेवल्यास त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही. मात्र, जे शहरातील कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावत आहे. अशा गुंडांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त