पुणे : ‘प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाकडून आकडे जाहीर होतात. मात्र, प्रत्यक्षात काय काम केले जाते, हा प्रश्न पडतो. नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केवळ अभियान घोषित करणे पुरेसे नाही. नदी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करायला हवे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी बुधवारी व्यक्त केले.

राम नदी पुनरुज्जीवन अभियानाला पाच वर्षे झाल्यानिमित्त किर्लोस्कर वसुंधरातर्फे पत्रकार भवन येथे आयोजित ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवा’च्या समारोप सत्रात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि राम नदीचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना डॉ. गाडगीळ यांच्या हस्ते पहिल्या ‘राम नदीसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या वेळी डॉ. गाडगीळ बोेलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर, किर्लोस्कर वसुंधराचे सहसंचालक आनंद चितळे, संयोजक वीरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते.

‘सन १९५२ च्या दरम्यान मुळा-मुठा नदीच्या पात्रात पोहायला जायचो. मात्र, आता पात्रात पोहण्याची कल्पनासुद्धा करवत नाही. प्रदूषणामुळे मुळा-मुठेची झालेली वाईट अवस्था बघवत नाही,’ अशी खंत डॉ. गाडगीळ यांनी व्यक्त केली.

डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘नदीचे प्रदूषण हे केवळ जलप्रदूषण नसते. नदीपात्रातील वनस्पती, प्राणी यांच्या अस्तित्वावरही नद्यांच्या प्रदूषणाचा परिणाम होतो. तिथली जैवविविधता धोक्यात येते. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. नदीच्या प्रदूषणाचा तिच्या जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.’

‘राम नदीच्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचा अभ्यास करायला हवा. तिथल्या नैसर्गिक स्रोतांचा शोध घेऊन त्यांच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुळा-मुठा या जमिनीच्या सम पातळीवर असल्याने त्याच्या आजुबाजूला असलेल्या वस्तीमुळे त्याचे जास्त प्रदूषण होते. तुलेनेने राम नदी उंचावर असल्यामुळे मुळा-मुठाच्या तुलनेत रामनदीचे शुध्दीकरण करणे अधिक सोपे आहे. राम नदी शुध्दीकरण प्रकल्प यशस्वीरित्या राबवून देशासमोर एक यशस्वी प्रारूप उभे करणे शक्य आहे. पर्यावरणसंवर्धन, जतन आणि संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असून, ते आपण कर्तव्यभावनेने केले पाहिजे,’ असे मत डॉ. वडगबाळकर यांनी व्यक्त केले.

‘किर्लोस्कर वसुंधराच्या माध्यमातून गेली पाच वर्षे या दिशेने प्रयत्न सुरू असून राम नदी शुध्दीकरणाच्या बाबतीत आशेचे किरण दिसू लागले आहेत. मला मिळालेला हा पुरस्कार मी प्रातिनिधीक स्वरूपात स्वीकारत असून पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार मी नम्रपणे समर्पित करीत आहे,’ अशी कृतज्ञ भावनाही डॉ. वडगबाळकर यांनी व्यक्त केली.

वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. अनिल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.