ग्लोबल वॉìमगमुळे वनांवर, वन्य जीवांवर तसेच जमिनीवर होत असलेले भीषण परिणाम रोखण्यासाठी वन हक्क कायद्यानुसार वनसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील लोकांचे व संस्थांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, प्रत्यक्षात मात्र वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याची खंतही गाडगीळ यांनी व्यक्त केली.
पाषाण येथील भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) ‘ग्लोबल वॉìमग : सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
स्थानिक लोकांच्या पुढाकाराने पर्यावरण रक्षणाचेच काम प्रभावीपणे होऊ शकते हे सांगताना गाडगीळ यांनी पाचगाव गावाने केलेल्या सामूहिक वनसंवर्धनाचा दाखला दिला. गावातील तेंदूच्या झाडाची पाने तोडण्याच्या प्रकारावर गावकऱ्यांनी बंदी आणली. तेंदूच्या झाडावर फळांची पूर्ण वाढ झाल्याशिवाय फळे न तोडण्याचा गावकऱ्यांचा निर्णय वन संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे गाडगीळ म्हणाले.
जागतिक हवामानात होत असलेल्या बदलांचे प्रमुख कारण मानवनिर्मित वस्तूंचा वाढत चाललेला वापर हे आहे. उच्चभ्रू वर्गाकडून होत असलेला ऊर्जेचा बेसुमार वापर, भौतिक जीवनशैली व मानवनिर्मित वस्तूंच्या हव्यासातून निर्माण होणारा टाकाऊ कचरा यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे, ग्लोबल वॉìमगचा सामना करण्याची जबाबदारी फक्त विकसित व विकसनशील देशांची नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही गाडगीळ यावेळी म्हणाले. घराबाहेर गोळा होणारा वाळलेल्या पानांचा कचरा जाळून न टाकता त्याचे कंपोिस्टग करून आपण पर्यावरणाची हानी रोखू शकतो, असा सल्लाही गाडगीळ यांनी यावेळी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhav gadgil warns about global warming