अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा महिला होणार असल्याचे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला निश्चित झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या औपचारिक घोषणा शनिवारी (९ मार्च) गोव्यामध्ये होणार आहे. प्रमुख कार्यवाह प्रा. मििलद जोशी यांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे वैद्य यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.
साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार एक एप्रिलपासून आगामी तीन वर्षांसाठी महामंडळाचे कार्यालय पुण्याकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी हे दोघेही स्पर्धेत होते. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष हे प्रमुख तीन पदाधिकारी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी होतात, असा ‘मसाप’च्या घटनेचा संकेत आहे. मात्र, साहित्य महामंडळावर पाठवावयाच्या प्रतिनिधींसंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेची अंमलबजावणी करायची की साहित्य महामंडळाच्या घटनेची यासंदर्भात मतभेद होते. ‘मसाप’च्या बैठकीमध्ये तीव्र मतभेद झाल्यानंतर अखेर हा निर्णय परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्याशी चर्चा करून घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तीन पदाधिकाऱ्यांची नावे साहित्य महामंडळाकडे पाठविण्यात आली.
गोव्यामध्ये शनिवारी होणाऱ्या बैठकीमध्ये साहित्य महामंडळाच्या आगामी अध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र, साहित्य महामंडळ सदस्यांसमोर ‘मसाप’ एकसंध आहे हे दाखविण्याच्या उद्देशातून अखेरच्या क्षणी प्रा. मिलिंद जोशी यांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीमध्ये डॉ. माधवी वैद्य यांची अध्यक्षपदी, प्रा. मििलद जोशी यांची प्रमुख कार्यवाहपदी आणि सुनील महाजन यांची कोशाध्यक्षपदी निवड ही आता केवळ औपचारिकताच उरली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महामंडळात मतदान झाले तरी देखील मी निश्चितच विजयी होईन याची खात्री असतानाही केवळ संस्थेच्या हिताचा विचार करून मी इच्छुक नसल्याचे प्रा. मििलद जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. संस्थेचे काम घटनेनुसार व्हावे आणि संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा महामंडळावर जाण्याची संधी नाकारली जाऊ नये या माझ्या भूमिकेचा अर्थ मी कोणाच्या तरी विरोधात आहे असा नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.