आदिवासींच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संशोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, या उद्देशातून पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्वायत्तता संपादन केलेली ही देशातील पहिलीच सरकारी संस्था ठरली आहे.
आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संस्थेतील प्रमुखांना प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी वारंवार मुंबईला मंत्रालयाच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या. ते टाळून येथील निर्णय संस्थेच्याच पातळीवर घेतले जावेत यासाठी स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारीच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला स्वायत्तता बहाल झाली आहे. संस्थेला आर्थिक निधी सरकारतर्फे दिला जाणार आहे. आदिवासी विकासासाठी सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मूल्यमापन याविषयीचे संशोधन करून संस्थेने सरकारला मार्गदर्शन करावे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचेही पिचड यांनी सांगितले.
राज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या ४५ अनुसूचित जमातींच्या आदिवासी संस्कृतीचा र्सवकष अभ्यास करून त्याविषयीचा अहवाल सरकारला सादर करणे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठी करण्यात आलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर, प्राथनिक वर्गातील आदिवासी मुलांसाठी द्वैभाषिक साहित्य निर्मिती आणि आदिवासी कला संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशातून महोत्सवाचे आयोजन, हे संस्थेचे भावी संकल्प असल्याचे पिचड यांनी सांगितले.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शनिवारी
संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम शनिवारी (२८ डिसेंबर) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागपूर येथे सुरू करण्यात येणाऱ्या गोंडवाना आणि वैदर्भीय संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे त्याचप्रमाणे डॉ. गोविंद गारे यांच्या स्मरणार्थ स्थापन होत असलेल्या कलादालनाचे प्रतीकात्मक उद्घाटन होणार आहे. आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्यकलांचे सादरीकरण होणार असल्याचे मधुकर पिचड यांनी सांगितले.

Story img Loader