पिंपरी : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची भुरळ आजही पडते यात काहीही शंका नाही. माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत स्वत: माधुरी दीक्षितने मोठे विधान करत ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील निगडीतील पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन माधुरी दीक्षित हिच्या हस्ते शुक्रवारी झाले. माधुरी दीक्षित हिने यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. कला क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात येण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता माधुरी दीक्षित म्हणाली, याबाबत मला खूपवेळा विचारले जाते. मी एक कलाकार आहे. कला हे माझे क्षेत्र आहे. त्यात मला रस आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का, असे विचारले असता ‘मी ते तुम्हाला का सांगू’ असे म्हणत माधुरी दीक्षितने निवडणूक लढविण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
हेही वाचा – पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण
हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात १५ किलोमीटरची रांग, वाहतूक कोंडीने सारेच त्रस्त
दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील उमेदवार अंतिम करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. भाजप अभिनेते, अभिनेत्री यांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील एका जागेवर माधुरी दीक्षितला निवडणुकीत उतरविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.