पुणे : बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकांची फसवणूक करणारी महिला ही सराफी पेेढीच्या मालकाच्या तत्परतेमुळे पकडली गेली. बनावट सोने देऊन सराफांची फसवणूक करणाऱ्या महिलेचे छायाचित्र सराफ व्यावसायिकांच्या समूहावर प्रसारित झाले होते. सराफी पेढीत बनावट सोने विक्रीसाठी आलेल्या माहिलेला सराफी पेढीच्या मालकाने ओळखले आणि त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलिसांनी या प्रकरणी मध्यप्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे.
साक्षी अविनाश सोनी (वय ३२, रा. प्रेमजी जीवन सेनोटेरियम, पुणे स्टेशन परिसर, मूळ रा. इटारसी, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सराफ व्यावसायिकाची गणेश पेठेत सराफी पेढी आहे. आरोपी साक्षी सोनीने बनावट सोने खरे असल्याचे भासवून शहरातील काही सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली होती. सराफी व्यावसायिकांच्या समाजमाध्यमातील समूहावर साक्षीचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते.
हेही वाचा >>> सिंहगड रस्ता, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसा बंद
गणेश पेठेतील सराफी पेढीत साक्षी बनावट सोने विक्रीसाठी आली होती. सराफी पेढीच्या मालकाने याबाबतची माहिती पेढीतील कर्मचाऱ्यांना दिली होती. साक्षीने बनावट सोने पेढीत दिले आणि त्या बदल्यात मंगळसूत्र खरेदी करण्याचा प्रयत्न केला. सराफी पेढीच्या मालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्वरित या घटनेची माहिती खडक पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतली. तिने सराफ बाजारातील तीन ते चार व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करत आहेत.