पिंपरी : महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेले पत्र आता प्रसिद्ध करावे. सगळय़ांच्या वाचनात आल्यानंतर त्या पत्राचा अर्थ काय निघतोय, ते लोकांनाही कळेल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आले असताना पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने पत्राद्वारे आपल्याला १५ दिवसांच्या आत या आमदारांची नियुक्ती करावी, असे सांगितले होते, याचा राग आल्यानेच १२ आमदारांची यादी रखडली, असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी केला होता. उद्धव ठाकरे सापळय़ामध्ये अडकले, असेही कोश्यारी म्हटले. मात्र, कोश्यारी यांनी शंकेला जागा निर्माण होईल असे न बोलता स्पष्ट सांगावे. कोणाच्या सापळय़ामध्ये उद्धव ठाकरे अडकले त्याचे नाव घ्यावे. नाव घ्यायला काय घाबरायचे कारण, असा सवाल पवार यांनी केला.