यंदा हीरक महोत्सव साजरा करीत असलेल्या मराठीतील अग्रगण्य अशा राजहंस प्रकाशनतर्फे वाचकांना एक अनोखी भेट देण्यात येणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अनुवादित केलेला ‘महाभारत’ हा एक हजार पृष्ठांचा दोन खंडातील सचित्र ग्रंथ केवळ २९५ रुपयांमध्ये उपलब्ध करून हा महोत्सव साजरा करण्याची अभिनव कल्पना ‘राजहंस’ ने प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आहे.
प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांनी सांगितले की, धर्म ही माणसाच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही बाब ध्यानात घेऊन राजहंस प्रकाशनने यापूर्वी फादर फ्रान्सिस दिब्रिटो लिखित ‘सुबोध बायबल’, शेषराव मोरे लिखित ‘मुस्लिम मनाचा शोध’ आणि ‘चार आदर्श खलिफा’ हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. हिंदू धर्माशी संबंधित अशा साहित्याचा विचार सुरू झाला तेव्हा फक्त धर्मविषयक साहित्यापेक्षाही संपूर्ण भारतीय संस्कृतीचे प्रतििबब उमटवणाऱ्या महाभारताचा विचार पुढे आला. महाभारताच्या उपलब्ध असलेल्या संहितांपैकी वाचकाला भावेल, महाभारताचा शक्य तितका विस्तृत समावेश असेल अशी कमला सुब्रह्मण्यम यांची संहिता डोळ्यासमोर आली. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी या संहितेचा रसाळ, प्रासादिक, काव्यमय आणि ओघवत्या शैलीमध्ये अनुवाद केला आहे. ‘कथारूप महाभारत’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी केले असून संपूर्ण ग्रंथाचे कलादिग्दर्शनही त्यांनी केले आहे. आतील देखणी सजावट चित्रकार गोपाळ नांदुरकर आणि राहुल देशपांडे यांनी केली आहे.
स्खलनशील माणूस आणि चिरंतन मूल्ये यांचा संघर्ष चितारणारे महाभारत म्हणजे भारतीय जीवनधर्माचा प्राणस्वरच आहे.
असंख्य मानवी नमुने, अलौकिक घटना, अवघे अस्तित्व कवटाळणारे तत्त्वज्ञान या साऱ्यांचा संगम असलेले हे महाकाव्य शतकानुशतके भारतीय मनावर राज्य करीत आहे. महाभारत म्हणजे केवळ ‘जय’ नावाचा इतिहास नाही किंवा केवळ ‘गीता’ सांगणारे तत्त्वज्ञान नाही. हे सांस्कृतिक संचित म्हणजे भारताच्या पिढय़ान्पिढय़ांचा अनमोल वारसा आहे. हा वारसा नातवापासून आजी-आजोबांपर्यंत साऱ्यांनाच आनंद देणारा ठरेल आणि जतन करण्याजोगाही ठरेल. १५ सप्टेंबपर्यंत या ग्रंथाची प्रकाशनपूर्व नोंदणी करण्यात येणार आहे. हे सांस्कृतिक धन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही माजगावकर यांनी सांगितले.
हीरक महोत्सवी ‘राजहंस’ तर्फे वाचकांना मंगेश पाडगावकर अनुवादित महाभारत भेट
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अनुवादित केलेला ‘महाभारत’ हा एक हजार पृष्ठांचा दोन खंडांतील सचित्र ग्रंथ केवळ २९५ रुपयांमध्ये उपलब्ध करून हीरक महोत्सव साजरा करण्याची अभिनव कल्पना ‘राजहंस’ ने प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आहे.
आणखी वाचा
First published on: 04-08-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharata translated by mangesh padgaonkar now available for just rs