लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामामध्ये संगमवाडी नदी पात्रात महादेवाची पिंड याबरोबर इंग्रजकालीन पिस्तूल देखील सापडली. पानशेत पुराच्या काळात या वस्तू येथे गाडल्या गेल्या असाव्यात, असे इतिहास अभ्यासकांनी सांगितले. ही ऐतिहासिक पिंड सापडल्याने ती पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

पानशेत पुरामध्ये संगमेश्वराचे मंदिर, त्याच्या समोरचे गोपूर आणि इतर मूर्ती वाहून गेल्या होत्या. या घटनेला ६१ वर्षे झाली असून संगमेश्वर मंदिर व परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे आणि समीर निकम गेल्या १५ वर्षापासून येथील वस्तूंचा शोध घेत आहेत. काही वर्षांपूर्वी मोठी हनुमानाची मूर्ती सापडली होती.

आणखी वाचा- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात दोन ठार, दोन जखमी

आता सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामातून शोध घेताना अखंड पाषाणात कोरलेली अडीचशे वर्षे जुनी महादेवाची पिंड सापडली. या पिंडीची उंची ७ ते ८ इंच आणि लांबी १७ ते १८ इंच आहे. हा विषय संशोधनाचा असून डेक्कन कॉलेजचे संशोधक या विषयावर प्रकाश टाकू शकतील, असे समीर निकम यांनी सांगितले.

त्याबरोबरच दगडाच्या ढिगाऱ्याखाली एक धातूची बंदूक सापडली आहे. हा परिसर इंग्रज अधिकाऱ्याच्या वास्तव्याचा होता. कदाचित ही बंदूक त्या काळातीलही असावी. सध्या ही बंदूक शास्त्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली आहे, असेही निकम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadev pinda and british pistol were found in the sangamwadi river pune print news vvk 10 mrj