महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांसह इतरही अनेक राज्यांत खतांची विक्री करणाऱ्या ‘महाधन’ या ‘ब्रँड’चा कारभार पुण्यातून चालतो. या ब्रँडने देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या खतांबरोबरच आयात केलेल्या खतांच्या विक्रीतही महत्त्वाचे स्थान मिळवले, तसेच खतांच्या विपणनासाठी काही नवीन पद्धतींचाही वापर केला.
‘महाधन’ हा ‘स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज’ या कंपनीचा खतांचा ‘ब्रँड’ आहे. ‘स्मार्टकेम’ ही ‘दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन’ची एक कंपनी. ‘दीपक फर्टिलायझर्स’चे संस्थापक अध्यक्ष सी. के. मेहता यांचा प्रथम अमोनिया उत्पादक कारखाना होता. हा अमोनिया वायू कच्चा माल म्हणून इतर खत कंपन्यांना विकला जात असे. त्यानंतर त्यांनी स्वत:चा खतनिर्मिती उद्योग सुरू करण्याचे ठरवले आणि १९९१ च्या सुमारास कंपनीने ‘महाधन’ या नावाने गुंतवणूकदारांसाठी ‘पब्लिक इश्यू’ बाजारात आणला. हे नावही खूप विचारपूर्वक निवडण्यात आले होते. तो ‘पब्लिक इश्यू’ यशस्वी ठरला आणि त्यातून मुंबईतील तळोजा येथे ‘महाधन’चा खत कारखाना उभा राहिला. ‘नायट्रो फॉस्फेट २३:२३:०’ हे खत ते बनवू लागले. शेतक ऱ्यांना सहज ओळखीचे व्हावे आणि महाराष्ट्राबाहेरही विकणे शक्य व्हावे म्हणून या खतालाही ‘महाधन’ हेच नाव देण्यात आले. सुरुवातीला कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु ‘ब्रँड’ मोठा करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू राहिले. काळानुसार खतामध्ये सुधारणा करून ‘महाधन २३:२३:०’ च्या ऐवजी ‘महाधन २४:२४:०’ हे खत आले. पण तोपर्यंत कंपनीचे हे एकच उत्पादन होते. व्यवसायाच्या विस्तारासाठी त्यांनी विविध प्रचलित खते आयात करून विकण्यास सुरुवात केली, तसेच पाण्यात मिसळण्याजोगी काही खतेही आणली. शेतजमिनीस ‘नायट्रोजन’, ‘फॉस्फरस’ आणि ‘पोटॅशियम’ हे घटक गरजेचे असतात. त्या व्यतिरिक्त गंधकाचीही शेतजमिनींमध्ये कमतरता दिसून येते. त्यासाठी त्यांनी ‘बेन्सल्फ’ (बेंटोनाइट सल्फर) या नावाने गंधकाचे खत बनवले. राज्यातील प्रगतिशील शेतकरी नेहमी त्यांच्यासाठी महत्त्वाचा ग्राहक राहिला.
‘‘सध्या देशात ‘२४:२४:०’ आणि ‘बेंटोनाइट सल्फर’ ही खते बनवणारी ‘महाधन’ ही सर्वात मोठी कंपनी आहे. पाण्यात विरघळणाऱ्या खतांची कंपनी करत असलेली विक्रीही मोठी आहे. शेतक ऱ्यांच्या गरजा ओळखणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. ‘२४:२४:०’ या खतामधून चटकन आणि सावकाश असा दोन प्रकारे जमिनीला नायट्रोजन मिळतो. टोमॅटो किंवा कांद्यासारख्या भाजी पिकांसाठी त्याचा फायदा होतो. या खतात पाण्यात विरघळणाऱ्या फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे, तसेच खत आम्लधर्मी असल्यामुळे जमिनीच्या ‘पीएच’साठी त्याचा फायदा होतो.
गंधकाच्या ‘बेन्सल्फ’ या खतामुळे पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढण्यास मदत होते,’’ असे ‘स्मार्टकेम’च्या ‘कॉर्पोरेशन न्यूट्रिशन बिझनेस’चे कार्यकारी उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी सांगतात. आता उत्पादनाकडे अधिक लक्ष देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तळोजा येथेच कंपनीने ७५० कोटी रुपयांची गुतवणूक केली असून खतनिर्मिती कारखान्याचा विस्तार केला आहे. त्यामुळे ‘महाधन २४:२४:०’ या खताची उत्पादन क्षमता ३ लाख टनांवरून ११ लाख टन होईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. शेतकरी वापरत असलेली विविध खते काही नवीन गुणधर्मासह या कारखान्यात बनवण्यात येणार आहेत.
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पुण्यातून चालते, तसेच त्यांची एक माती परीक्षण प्रयोगशाळाही येथे आहे. शेतकी महाविद्यालय आणि शेतीशी संबंधित विविध सरकारी कार्यालयेही पुण्यात असल्यामुळे कॉर्पोरेट कार्यालय येथे असणे त्यांना महत्त्वाचे वाटते. पूर्वी कंपनी महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकमध्ये खतांची विक्री करत होती. आता १२ ते १५ राज्यांमध्ये त्यांची खते विकली जातात. खतांच्या विपणनातही वैविध्य आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतक ऱ्यांचे मेळावे घेण्यासारख्या नेहमीच्या विपणन पद्धतींबरोबरच समाजमाध्यमांवरूनही त्यांनी ‘महाधन’ हा ब्रँड रुजवण्याचा प्रयत्न केला. इंटरनेट वापरणाऱ्या तरुण शेतक ऱ्यांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यांनी ‘गुगल प्ले स्टोअर’वर ‘महाधन’ ब्रँडचे ‘अँड्रॉइड अॅप’ देखील आणले आहे. त्यात जमीन व पिकाविषयीची माहिती भरून शेतक ऱ्यांना शेतीत किती खत वापरायचे हे कळू शकते. शेतीत नवे प्रयोग करणाऱ्या शेतक ऱ्यांच्या यशाची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही मार्ग त्यांनी अवलंबला.
sampada.sovani@expressindia.com