पुणे : ‘महाकुंभ’मध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतरही राज्यातील भाविकांचा प्रयागराज येथे जाण्यासाठी ओघ सुरूच आहे. रेल्वेचे ३० मार्चपर्यंत, विमानांचे पुढील महिनाभर आणि खासगी बसचे पर्वणीनुसार आगाऊ आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातून अनेक भाविक खासगी प्रवासी वाहनांनी प्रयागच्या दिशेने प्रयाण करत आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा ‘महाकुंभ’ तब्बल १४४ वर्षांनी होत आहे. त्यामुळे देश-विदेशातून भाविकांची गर्दी होत आहे. मौनी अमावस्या पर्वणीच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढल्याने मंगळवारी (२८ जानेवारी) मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. पण, या पार्श्वभूमीवरही राज्यातील भाविकांकडून करण्यात आलेल्या नियोजनावर परिणाम झाला नसल्याचे रेल्वेतील आरक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेचे मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग असून, या रेल्वे मार्गावरून महाकुंभानिमित्त प्रयागराजसाठी ३४ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी पुणे ते प्रयागराजपर्यंत एक ते २० जानेवारीपर्यंत ४९ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. महाकुंभानिमित्त पुणे ते मऊ अशा सहा अतिरिक्त रेल्वे गाड्या आहेत. या गाड्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने प्रवाशांची ने-आण करत आहेत, तर ३० मार्चपर्यंत प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण झाले आहे. प्रतीक्षेतील प्रवाशांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असून, दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरक्षण रद्द करण्यात आले नसल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
हवाई मार्गाने प्रवासाला प्राधान्य
● रेल्वेसाठी आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांकडून हवाई प्रवासाचा मार्ग अवलंबिण्यात आला आहे. मात्र, हवाई प्रवासाचे एक महिन्याचे आरक्षण झाले आहे. अकासा एअर कंपनीची पुणे ते प्रयागराज हवाई वाहतूक सेवा २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
● दिल्लीमार्गे विमानाचे उड्डाण असले, तरी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केले आहे. पाच तासांच्या प्रवासासाठी २५ ते ३० हजार रुपयांचे प्रवासी शुल्क मोजून आरक्षण केले आहे. मुंबई ते प्रयागराजसाठी ६० हजार, तर नागपूर विमानतळावरूनही याचप्रकारे प्रवासी दर आकारले जात आहेत.
‘महाकुंभ’निमित्त कंपनीच्या इंदूर आणि नागपूर येथून प्रति दिवस चार बस प्रयागराजच्या दिशेने सोडल्या जात असून, शंभर प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. मात्र, प्रयागराज येथील रस्ते मार्गांवर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा असल्याने बसची संख्या वाढविण्यात अडथळा येत आहे. – प्रसन्न पटवर्धन, प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्स
पुण्यातून २५ ते ३० आसनी ‘मिनी ट्रॅव्हल्स’ना प्रवाशांची पसंती आहे. ५५ रुपये प्रति किलोमीटर दरानुसार ही वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दौंड, बारामती, इंदापूर या ग्रामीण भागातील नागरिकांकडून, तसेच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडूनही मागणी आहे. आतापर्यंत ६२ वाहने पुण्यातून प्रयागराजला पाठविण्यात आली आहेत. – राजन जुनावणे, अध्यक्ष, पुणे बस व कार मालक संघटना
खासगी बसद्वारे प्रवासाचा पर्याय
‘रेल्वे आणि विमानांचे आरक्षण पूर्ण झाल्याने खासगी बसद्वारे प्रवासाचा पर्याय स्वीकारण्यात येत आहे. पुण्यातून प्रयागराजला आतापर्यंत ५०० खासगी बसच्या फेऱ्या झाल्या आहेत. दिवसाला आठ ते दहा प्रवासी बस पुण्यातून रवाना होत आहेत. त्यासाठी प्रतिव्यक्ती १५ हजार रुपये भाडेदर आकारले जात आहे. प्रयागराजपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने विलंब होत असला, तरी प्रवाशांचा उत्साह कायम आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.