पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीला चालना मिळावी, प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता यावा या अनुषंगाने महामेट्रोकडून खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याबाबतच्या सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, खराडी परिसर व्यावसायिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असल्याने या ठिकाणी ‘इंटरचेंजेबल अँड मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित करावे. जेणेकरून विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गांचा पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने कार्यवाही करण्याच्या सूचना मोहोळ यांनी केल्या आहेत.

पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रो जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी असावी आणि पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून, वाहतूक नियोजनासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली. पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले उपस्थित होते.

पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे कात्रज ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार करण्याबात सूचना देण्यात आल्या. या दोन्ही भागांमध्ये होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करून हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मेट्रो मार्गात समाविष्ट करून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोडी हवाई प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री, राज्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. खराडी ते लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो झाल्यास पुण्यातील उद्याोधंद्यात वाढ होऊन आर्थिक विकास होईल. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ