पुणे : मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महामेट्रोने ‘एक पुणे कार्ड’ हे प्रीपेड कार्ड सुरू केले असून, ते बहुउद्देशीय आहे. पहिल्या १५ हजार जणांना हे कार्ड मोफत दिले जाणार असून, मंगळवारपर्यंत १२ हजार ६०० जणांनी हे कार्ड घेतले आहे.
‘एक पुणे कार्ड’ पुणे मेट्रोच्या प्रवासाबरोबरच देशात कुठेही किरकोळ ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. त्यामुळे देशातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये त्याचा वापर करता येणार आहे. हे कार्ड स्पर्शविरहित असून, त्यामुळे व्यवहार जलद होतात. या कार्डद्वारे पाच हजार रुपयांपर्यंत व्यवहारासाठी कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. या कार्डद्वारे कोणतेही लहान-मोठे व्यवहार सहज करता येऊ शकतात.
आणखी वाचा-सावधान! रेल्वेने विनातिकीट प्रवास करताय…
‘एक पुणे कार्ड’ सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून प्रवासी कार्ड मिळवू शकतात. हे कार्ड पहिल्या १५ हजार जणांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत १२ हजार ६०० कार्डची विक्री झालेली आहे. त्यानंतर कार्डची किंमत १७७ रुपये अशी असणार आहे. सध्या मेट्रो प्रवाशांसाठी शनिवार व रविवार प्रवासी भाड्यामध्ये ३० टक्के सवलत देण्यात आली आहे.
सध्या ‘एक पुणे कार्ड’चा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी १० टक्के सवलत लागू आहे. विद्यार्थ्यांसाठी (पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या) भाड्यामध्ये ३० टक्के सवलत आहे. लवकरच पुणे मेट्रो विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्ड उपलब्ध करून देणार आहे. -हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो