लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून घरापंर्यंत अशी सुलभ सेवा देण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनकडून (महामेट्रो) रिक्षाचालकांसोबत लवकरच ‘सामाईक कृती आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. मेट्रोचे सहज वापर आणि वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महामेट्रोने रिक्षाचालक संघटनांच्या मदतीने कार्यवाही करण्याबाबत पुढाकार घेतला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. मात्र मेट्रोच्या अनेक मार्गांवर मेट्रोच्या मार्गिकांचे विस्तारीकरण प्रकल्प प्रलंबित असून ज्या ठिकाणी मेट्रो मार्गच नाहीत, अशा ठिकाणच्या प्रवाशांना मेट्रोचा सुलभ प्रवास करता यावा म्हणून रिक्षाचालकांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी महामेट्रो आणि रिक्षाचालक संघनटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षाचालकांना पूरक सेवा (फीडर) देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या प्रवाशाना मेट्रो स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी वैयक्तीक वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक मेट्रो स्थानकांच्या ठिकाणी वाहनतळाची सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानंतर नागरिकांना मेट्रो स्थानकांना सुविधा निर्माण होण्यासाठी रिक्षाचालकांनी घरापासून स्थानकापर्यंत सेवा देण्याबाबत सामाईक सेवा देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे. याबाबत महामेट्रो आणि रिक्षाचालक संघटनांसोबत सामाईक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात स्थानकांची निश्चिती, वेळापत्रक आणि प्रवासी संख्या, प्रवाशी दर निश्चिती आणि सुविधांचा समावेश असणार आहे, अशी माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

घरापासून स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी रिक्षाचालकांनी जवळच्या अंतरापर्यंत मीटरदराद्वारे सुविधा दिल्यास, फेऱ्या वाढविल्यास मेट्रोला याचा फायदा होईल. रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य मिळेल. रस्त्यांवर खासगी वाहनांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक कोंडीतून काहीशी सुटका होईल. प्रवाशांना सुलभ प्रवास करता येईल. प्रवाशांच्या अडचणी कमी होईल. याबाबत सामाई कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. -श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे</strong>

मेट्रो प्रवाशांना सामाईक सेवा देण्यासाठी रिक्षाचालक आणि संघटनांकडून नक्कीच जागृकता निर्माण करण्यात येईल. मीटर आधारीत सेवा देण्यासाठी आणि प्रवाशांना सेवा रिक्षासंघटनांकडून नेहमीच सहकार्य असेल. -बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना

Story img Loader