महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धेची पळवापळवी सत्ताधाऱ्यांकडून केली जात असल्यामुळे आता क्रीडा समिती बरखास्त करावी, अशी मागणी मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी केली आहे. महापौर चषक कबड्डी स्पर्धा पळवण्यासाठी बुधवारी सत्ताधाऱ्यांनी हुकूमशाही केल्याचा तसेच अध्यक्षांनी विरोधकांना फसवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
महापौर चषक कबड्डी स्पर्धा सिंहगड रस्ता भागात आयोजित करण्यासंबंधीचा ठराव क्रीडा समिती सदस्य, भाजपचे श्रीकांत जगताप यांनी जुलै महिन्यात दिला होता. त्यानंतर भाजपचे दिलीप काळोखे आणि मनसेच्या रूपाली पाटील यांनी ही स्पर्धा नातूबाग मैदानावर भरवावी, असा ठराव गेल्या महिन्यात दिला होता. मात्र, बहुमताच्या जोरावर सभागृहनेत्यांनी दिलेला स्पर्धा तळजाई येथे आयोजित करण्याचा ठराव क्रीडा समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
ही स्पर्धा तळजाई येथे व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मनमानी केली आणि बहुमताच्या जोरावर हा निर्णय व्हावा यासाठी बैठकीत कधी न येणाऱ्या महापौर आणि उपमहापौरही बुधवारी उपस्थित राहिले होते, असे रूपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वास्तविक, गेल्या महिन्यातील एका बैठकीत सत्ताधाऱ्यांची संख्या कमी होती आणि आमचे बहुमत होते. त्याचवेळी आम्ही आमच्या म्हणण्यानुसार स्पर्धेचा ठराव मंजूर करून घेऊ शकलो असतो; पण अध्यक्ष अनिल टिंगरे यांनी हा ठराव एकमताने करू, असे सांगितल्यामुळे आम्ही आग्रह धरला नाही. प्रत्यक्षात अध्यक्षांनी आमची फसवणूकच केली, असेही त्या म्हणाल्या. नातूबाग मैदान कबड्डी स्पर्धेसाठी प्रसिद्ध असून तेथे ही स्पर्धा भरवण्यात औचित्य होते, यासाठीच आमचा या जागेसाठी आग्रह होता, असे काळोखे म्हणाले.
क्रीडा समिती, विधी समिती, महिला बाल कल्याण समिती या सर्वच समित्यांमध्ये सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही सुरू असल्यामुळे या समित्यांना अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे या सर्व समित्या बरखास्त कराव्यात अशीही मागणी श्रीकांत जगताप, दिलीप काळोखे, रूपाली पाटील, सुनीता साळुंके, अर्चना कांबळे आणि सोनम झेंडे या विरोधी सदस्यांनी केली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीचा निषेध
महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धेची पळवापळवी सत्ताधाऱ्यांकडून केली जात असल्यामुळे आता क्रीडा समिती बरखास्त करावी.
First published on: 24-10-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahapaur chashak kabaddi spardha