पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) घेतल्या जाणाऱ्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी २मधील (पॅट २) इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले. नववीची मराठी भाषा विषयाची परीक्षा मंगळवारी (८ एप्रिल) असताना सोमवारीच ही प्रश्नपत्रिका सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासंदर्भातील चित्रफीत समाज माध्यमात प्रसिद्ध झाली. संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळांमधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘एससीईआरटी’च्या वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. मात्र, या वेळापत्रकामुळे यंदा परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबल्या आहेत. त्यामुळे या वेळापत्रकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून बदलाची मागणी करण्यात आली होती. तसेच मुख्याध्यापक संघाने ‘पॅट’ परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवून शाळा स्तरावरील परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शनपर वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, ‘एससीईआरटी’ने वेळापत्रकात बदल केला नाही. ‘एससीईआरटी’च्या वेळापत्रकानुसार नववीची मराठी प्रथम भाषा विषयाची परीक्षा, आज मंगळवारी घेतली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर, नववीची मराठी प्रथम भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या माहितीसह प्रश्नपत्रिका सोडवण्याबाबत मार्गदर्शन करणारी चित्रफीत समाजमाध्यमातील एका वाहिनीवर प्रसिद्ध झाली. संबंधित चित्रफीत दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील प्रश्नपत्रिकेवर ‘एससीईआरटी’च्या बोधचिन्हासह संकलित मूल्यमापन २ : २०२४-२५ लिहिल्याचे दिसून येत आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासंदर्भातील मार्गदर्शन या चित्रफितीमध्ये करण्यात आले आहे. ‘पॅट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे या परीक्षेच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले म्हणाले, ‘पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वितरणात गोपनीयता असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. तसेच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने होईल की नाही, याबाबत शंका निर्माण होते.’
समाज माध्यमांतील दोन वाहिन्यांवर प्रश्नपत्रिका फुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे. संबंधित वाहिन्या बंद करण्याचाही प्रयत्न आहे.
राहुल रेखावार, संचालक, एससीईआरटी