पुणे: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. या दरम्यान काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. निवडणुकीत अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. असे अघोरी प्रकार करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा अनेक तक्रारी येतात. निवडणूक काळात मतदारांवर दबाव टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, दीपक माने, भगवान रणदिवे, शंकर कणसे, हौसेराव धुमाळ, सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे यांनी केले.

हेही वाचा : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण

मतदारांच्या मनात अंधश्रद्धेची भीती निर्माण करणाऱ्या या प्रकारांमध्ये नारळावर हात ठेवून विशिष्ट व्यक्तीला मत देण्याची शपथ घ्यायला लावणे, देवाचा भंडारा-अंगारा उचलून मत देण्यासाठी शपथ घ्यायला लावणे, जवळच्या प्रसिद्ध देवस्थानावर मतदारांना घेऊन जाऊन पुजाऱ्याकडून शपथ घ्यायला लावणे, मांत्रिक- तांत्रिकांना गावामध्ये बोलावून महिला मतदारांवर दबाव निर्माण करणे, धर्मगुरूंना बोलावून मतदारांवर प्रभाव टाकणे, विरोधी उमेदवाराच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू मिरची, नारळ याचा उतारा टाकणे. विरोधी उमेदवारावर तथाकथित काळी जादू-करणीचा प्रकार करणे असे निखळ अंधश्रद्धेचे अनेक प्रकार सध्या निवडणूक काळात घडत आहेत. मतदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याने हे प्रकार आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहेत, तसेच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार असे प्रकार करून दहशत निर्माण करणे हा गुन्हा असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra andhashraddha nirmulan samiti demand strict action on lok sabha candidates who spread superstitions pune print news ccp 14 css