“पाश्चात्य विवेकवादी परंपरेपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा ही समृद्ध आहे. बुद्ध, चार्वाक, संत आणि सुधारकांची विवेकवादी परंपरा जैविक आहे,” असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (महा अंनिस) अध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी “संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला,” असंही नमूद केलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘संतविचार, संविधानिक मूल्ये व विवेकवादी परंपरा’ या विषयावर एकदिवसीय शिबिर आयोजित केले होते. त्याच्या उद्घाटन सत्रात अविनाश पाटील बोलत होते.
“संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला”
अविनाश पाटील म्हणाले, “माणूस हा भावना आणि विचारांचे मिश्रण आहे. भारतीय विवेकवादी परंपरेत भावना आणि विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे ती परंपरा मानवी जगणे उन्नत करण्यासाठी उपयुक्त आहे. पाश्चात्य विवेकवादी परंपरा ही अधिक तर्ककठोर आणि विचारांवर आधारलेली असल्याने ती मनुष्याला बांधून ठेवण्यात कमी पडत आहे. संत सुधारकांचा वारसा कालसुसंगतपणे समजून घेण्याची गरज आहे. तो समाज सुधारणेचा भाग आहे. तो समाज बदलाची प्रक्रिया म्हणून महत्वाचा आहे. संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला आहे.”
“संतांनी भावनेला साद घालत तर्कशुद्ध मांडणी केली”
“संतांनी केलेली मांडणी ही आजच्या एकूणच धर्मांधतेला उत्तर देण्यास प्रभावी आहे, हे सप्रमाण सांगून अत्यंत सडेतोड, तर्कसुसंगत मांडणी धम्मकीर्ती महाराजांनी केली. जागतिक पातळीवर विज्ञान दृष्टिकोन विकसित झालेला नव्हता तेव्हा १२ व्या शतकात भारतात संत परंपरेने भावनेला साद घालत तर्कशुद्ध आणि कार्यकारणभाव असलेली मांडणी केली. त्या काळच्या अंदाधुंदीला उत्तर दिले. तीच संतांची मांडणी आजच्या काळालाही उत्तर आहे,” असे गणेश महाराज फरताळे यांनी सांगितले.
हेही वाचा : “डॉ. दाभोलकरांच्या खुनाला १० वर्षे होऊनही मारेकरी मोकाट का?”; महाराष्ट्र अंनिसचा सरकारला सवाल
सत्राच्या अध्यक्षस्थानी लालचंद कुंवर होते. यावेळी शिबीराचे समन्वयक, पूर्णवेळ कायकर्ते विशाल विमल उपस्थित होते. शाखेचे सचिव शाम येणगे यांनी प्रास्ताविक केले. दुसऱ्या सत्रात संत साहित्याचे अभ्यासक धम्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी मांडणी केली तर अध्यक्षस्थानी केशव कुदळे होते. तिसऱ्या सत्रात गणेश महाराज फरताळे यांनी मांडणी केली तर अध्यक्षस्थानी माधुरी गायकवाड होत्या.
प्रत्येक सत्रानंतर प्रश्न उत्तरांच्या माध्यमातुन प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. संतविचार, संविधानिक मूल्ये विवेकवादी परंपरेची सांगड घालून प्राप्त परिस्थितीला उत्तर देता येईल असा आशावाद शिबिरार्थींकडून व्यक्त झाला. शिबीरातून जो संवाद घडला त्यातून वैयक्तिक व सामूहिक पातळीवर कृतीकार्यक्रम ठरला आहे. मयूर पटारे, शीतल साठे, विनोद लातूरकर, स्नेहल लांडगे, प्रवीण खुंटे, योगेश्वरी भोसले, आकाश छाया, स्वप्नील भोसले, रविराज थोरात, रतन नामपल्ले, प्रिया आमले, प्रतीक पाटील यांचा गायन, परिचय, सुत्रसंचलन, संयोजनात सहभाग होता.