“अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. रावणाबरोबर फोनवर बोलतो. आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबाद्वारे समाधान प्राप्त करून देतो. ईश्वराचा दूत आहे, असे अनेक दावे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री त्यांच्या कार्यक्रमातून करतात. तसेच संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात. संविधान मूल्यविरोधी, अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करतात,” असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. अंनिसने पुण्यात सोमवार ते बुधवार या तीन दिवस होणाऱ्या बागेश्वर बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. महा. अंनिस पुणे जिल्हा कार्यकारिणीने याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल म्हणाले, “भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव, धर्म, श्रद्धा उपासनेचे स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र व्यक्तीच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासनेच्या आधारे फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल, तर त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे. महा. अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे.”

पुण्यात महा. अंनिसने घेतलेली पत्रकार परिषद

“बागेश्वरचे बाबा अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत”

“बागेश्वरचे बाबा हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव, धर्म, श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत आहेत. अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र बागेश्वरचे बाबा अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत,” असा आरोप विशाल विमल यांनी केला.

“तुकोबांची पत्नी ही त्यांना दररोज मारहाण करीत असे म्हणून…”

“देशात केंद्र शासनाचा ‘ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज अॅडव्हरटाइजमेन्ट ऑब्जेक्शनेबल ॲक्ट १९५४’ आणि राज्यात १० वर्षांपासून जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. या कायद्याचे उल्लंघन बागेश्वरच्या बाबांकडून होत आहे. जिजाई उर्फ आवली ही तुकोबांची पत्नी ही त्यांना दररोज मारहाण करीत असे म्हणून ते रामजीचे भक्त झाले, असेही संत तुकाराम महाराजांबद्दल खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य या बाबांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत,” अशी माहिती विशाल विमल यांनी दिली.

अंनिसच्या नेमक्या मागण्या काय?

१. बागेश्वरचे बाबा हे भारतीय राज्यघटनेच्या तत्वाशी विसंगत असे अशास्त्रीय दावे, भाष्य करत आहेत. त्यामुळे घटनेच्या तत्वाच्या विरोधी दावे व भाष्य करणाऱ्या बाबांवर शासन व्यवस्थेने जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार कारवाई करावी.

२. संतांसंबंधी बागेश्वरच्या बाबांचे बदनामीकारक, अब्रुनुकसानकारक वक्तव्य भाष्य लक्षात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि अन्य कायद्यानुसार कारवाई करावी.

३. बागेश्वरचे बाबा करत असलेले दावे अशास्त्रीय असल्याची उकल करून वैज्ञानिक विचार समाजात रुजवण्यासाठी शासनाने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था आदींमार्फत प्रयत्न करावेत.

४. बागेश्वरचे बाबांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे. त्याला शासनाने पाठबळ द्यावे.

५. बागेश्वरचे बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करावेत, हे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे. यासंबंधी प्रसारमाध्यमातून बाबांना आव्हान दिले आहे. संघटनेच्यावतीने लवकरच बाबांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीत दावे सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. ते दावे सिद्ध केल्यास २१ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

६. पुण्यात संगमवाडी परिसरात बागेश्वरच्या बाबांचा कार्यक्रम २०, २१ व २२ नोव्हेंबरला होत आहे. अशास्त्रीय, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आणि बदनामीकारक वक्तव्य आणि प्रक्षोभक विधाने, सामाजिक स्वास्थ बिघडवणारी वक्तव्ये बागेश्वरच्या बाबांकडून घडू नये यासाठी बाबा आणि कार्यक्रमांच्या संयोजकांना शासन व्यवस्थेने सक्त ताकीद द्यावी.

७. पुण्यात होत असलेल्या सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करण्याची सूचना संयोजकांना शासनाने द्यावी. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य घडल्यास बाबांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.

सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्याकडे धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करताना अंनिस पदाधिकारी

हेही वाचा : “संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला”; अविनाश पाटील यांचे वक्तव्य

संघटनेचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल, महा.अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सम्यक वि. म., पुणे जिल्हा सचिव संजय बारी, जिल्हा पदाधिकारी एकनाथ पाठक, प्रतीक पाटील आदींच्या वतीने या विषयावर निवेदन देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra annis demand action against dhirendra krishna joshi amid pune program pbs