महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (१९ ऑगस्ट) पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना १० व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘आवाज दो – हम एक है, लढेंगे जितेंगे’, ‘दहा वर्षे खुनाची -कार्यरत विवेकी असंतोषाची’, ‘फुले शाहू आंबेडकर – आम्ही सारे दाभोलकर’, ‘हिंसा के खिलाफ – मानवता की और’ या घोषणा दिल्या आणि मशाल प्रज्वलित केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाभोलकर यांचा खून झाला त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल येथे स्मृतिजागर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पावसात उभे राहून कार्यकर्त्यानी गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे अभिवादन केले.

“दाभोलकरांचा खून होऊन साडेतीन हजार दिवस”

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले, “दाभोलकरांचा खून होऊन साडेतीन हजार दिवस झाले. आमचा माणूस तर गेलाच, पण त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करून समाजात कायदा सुव्यवस्था नांदते हे सांगण्यात केंद्र-राज्य सरकार आणि तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. कारवाईच्या मागणीसाठी दाभोलकरांच्या वैचारिक वारसदारांनी मोठा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सरकारने कार्यकर्त्यांचा अंत पाहू नये.”

“खुनाचे सूत्रधार माहीत असूनही कारवाई होत नाही”

“राज्य-केंद्र सरकारला दाभोलकरांच्या खुनाचा आणि तपास, कारवाईचे गांभीर्यच नाही. खुनाचे सूत्रधार माहीत असूनही कारवाई होत नाही. त्यांचा शोध घेवून त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाही करावी. या अक्षम्य विलंबाबाबत राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी माधव बावगे यांनी केली.

हेही वाचा : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश…”

महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पुणे जिल्हा अध्यक्ष मानव कांबळे, विचारवंत आनंद करंदीकर, प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले. डॉ. ठकसेन गोराणे यांनी प्रास्ताविक तर विशाल विमल यांनी सूत्रसंचलन समारोप केला. अनिल करवीर, परिक्रमा खोत, माधुरी गायकवाड, राहुल उजागरे, अनिल दरेकर, स्वप्नील मानव यांनी गाणी सादर केली. मेणबत्या आणि मशाल पेटवून कार्यकर्त्यानी दाभोलकरांना अभिवाद केले. महा.अंनिससह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

२० ऑगस्टला मूकमोर्चा, निर्धार मेळावा

रविवारी (२० ऑगस्ट) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल पुणे येथे सकाळी ७ वाजता दाभोलकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. अभिवादन व परिवर्तनवादी गीते सादर केली जातील. अभिवादन झाल्यावर पुलापासून एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत एस एम जोशी सभागृहात राज्यस्तरीय विवेकी निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात प्रसिद्ध विचारवंत, लेखक डॉ. राम पुनियानी, मुक्त पत्रकार हेमंत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, संघटनेचे कार्याध्यक्ष माधव बावगे, प्रधान सचिव संजय बनसोडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष अविनाश पाटील असतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra annis march over 10 years of dr narendra dabholkar murder pbs
Show comments