महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा यांच्यावर सत्संग व दरबाराच्या माध्यमातून अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये व कृती केल्याचा आरोप केला आहे. तसेच धीरेंद्र शास्त्रींनी ते करत असलेले दावे सिद्ध करावेत. आम्ही त्यांना २१ लाख रुपयांचं बक्षीस देऊ, असं खुलं आव्हान दिलं आहे. याबाबत महा. अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी निवेदन जारी करत संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाल विमल म्हणाले, “बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा सत्संग व दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्याला महा. अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी शासन यंत्रणेकडे केली. तसेच बाबा जे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, वक्तव्य, दावे, कृती करत आहे, त्यासंबंधी बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत. बाबांना २१ लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे आव्हान बाबांना महा. अंनिसने वेळोवेळी दिले. मात्र, ते आव्हान बाबा लेखी स्वरूपात स्वीकारत नाहीत.”

“धीरेंद्र शास्त्रींकडून अंनिसने दिलेल्या आव्हानविषयी दिशाभूल”

“पुण्यात सोमवार ते बुधवार या तीन दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाबांनी सोमवारी (२० नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत महा. अंनिसने दिलेल्या आव्हान प्रक्रियेसंबंधी दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याचे प्रसारमाध्यमातून समजले. ते म्हणाले की, त्यांच्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू, एकदाच आमने-सामने होऊन जाऊ द्या. मात्र, सोशल मीडियावर बाबांचे जे भक्त हिंसक प्रतिक्रिया देतात, स्वतः बाबाही अशास्त्रीय, असंवैधानिक, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चितावणीखोर आणि भडकावून वक्तव्य करतात. त्यामुळे आक्षेप, खुलासे, दाव्यांची सिद्धता दरबारात, सत्संगाच्या ठिकाणी शांततेत कशी होऊ शकते?”, असा प्रश्न विशाल विमल यांनी विचारला.

व्हिडीओ पाहा :

“ही बाबांनी काढलेली पळवाट आहे”

विशाल विमल पुढे म्हणाले, “उलट दरबारात आमने सामने आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वस्तुस्थिती पाहता बाबांच्या दरबारात अथवा सत्संगाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असणारी शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि खुद्द बाबाही आमने-सामने वक्तव्य आणि दाव्यांची सिद्धता चाचणी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे दरबारात, सत्संगाच्या ठिकाणी आमने-सामने यावे असे म्हणणे ही बाबांनी काढलेली पळवाट आहे. महा. अंनिसने आजवर विविध धर्मीय बुवाबाबा, अम्मा आणि ताईंच्या अशास्त्रीय दाव्यांचा पर्दापाश केला आहे. अनेक बाबांना आव्हान देऊन त्यांची सिद्धता चाचणी घेऊन त्यांचे दावे खोटे असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करण्याचे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे.”

हेही वाचा : “रावणाबरोबर फोनवर बोलतो, लिंबाद्वारे…”; बागेश्वर बाबांच्या पुण्यातील कार्यक्रमाआधी अंनिस आक्रमक, म्हणाले…

“शासनाने या प्रकरणाकडे केवळ बघ्याच्या भूमिकेतून पाहू नये”

“आव्हान स्वीकारल्याचे लेखी द्यावे. महा. अंनिस बाबांच्या संबंधी जी भूमिका घेत आहे ती संवैधानिक आहे. त्यामुळे शासन व्यवस्थेने या प्रकरणाकडे केवळ बघ्याच्या भूमिकेतून न पाहता, पुढाकार घेऊन नियंत्रित परिस्थितीत दाव्यांची सिद्धता चाचणी आयोजनात सहभाग दर्शवावा. बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत. आम्ही पुन्हा बाबांना आव्हान देत आहोत. संघटनेच्यावतीने लवकरच बाबांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीत दावे सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अंनिस तयार आहे. बाबांनी दावे सिद्ध केल्यास २१ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल,” असंही विशाल विमल यांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra annis open challenge of 21 lacs to dhirendra shastri joshi in pune pbs