पिंपरी : लोकसभा निवडणुकीवेळी मध्यरात्री बँकांच्या शाखा खुल्या ठेवूनही काय झाले ते राज्याने पाहिले. आता भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’ सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
भोसरीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ निगडीतील, यमुनानगर येथील मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. शिवसेनेचे (ठाकरे) उपनेते, आमदार सचिन अहिर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवि लांडगे, माजी नगरसेविका भीमाबाई फुगे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामती, शिरूरमध्ये बँकांच्या शाखा रात्री खुल्या होत्या. त्यातून कसे लक्ष्मी दर्शन झाले हे पाहिले. परंतु, लक्ष्मी दर्शन होऊनही निकाल काय लागले हे सर्वांनी पाहिले आहे. आता भोसरी मतदारसंघांमध्ये तर वेगळे चित्र सुरू असल्याचे समोर येत आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा यानंतर आता ‘ऑनलाइन लक्ष्मीदर्शन’ सुरू आहे, असे खासदार कोल्हे म्हणाले.
हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…
राज्यात अनेक योजनांचा पूर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत तर ‘आपण आमदार होऊ आणि महापालिकेचा मलिदा खाऊ’ ही योजना अनेक दिवसांपासून लागू आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरात शिवसेनेला (ठाकरे) एक जागा मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका हाेती. खासदार संजय राऊत यासाठी सातत्याने आग्रही हाेते. मात्र, आघाडी टिकली पाहिजे, आघाडी मजबुतीने पुढे जायला पाहिजे, त्यामुळे कमी जागा मिळाल्यानंतरही आम्ही आघाडीची भूमिका घेऊन पुढे जात आहाेत. शिवसैनिकांनी त्यागाची भूमिका घेतल्याचे आमदार अहिर यांनी सांगितले.