Maharashtra Assembly Election 2024 Shivsena Uddhav Thackeray VS NCP Sharad Pawar : पिंपरी, चिंचवड व भोसरी हे पुण्यातील तीन महत्त्वाचे मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला मिळाले आहेत. यातील एक तरी जागा शिवसेनेला (ठाकरे) मिळावी यासाठी शिवसैनिक प्रयत्न करत होते. मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना वाटाघाटीत काहीशी अपयशी ठरल्याचं दिसत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाने सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी दिली आहे, तर चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे व भोसरीमधून अजित गव्हाणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तिन्ही मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाकडे गेल्यामुळे पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघांमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले आहेत. या तिन्ही मतदारसंघातील शिवसैनिकांनी बंडाचं निशाण देखील फडकावलं आहे. तिन्ही मतदारसंघांमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक आज (२७ ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत तिन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्यावर शिवसैनिकांचं एकमत झालं आहे.
याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) शहराध्यक्ष सचिन भोसले म्हणाले, “पिंपरी, चिंचवड व भोसरी येथील मविआचे तिन्ही उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार नाही. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचत आहे”.
“उद्धव ठाकरेंविरोधात षडयंत्र”
सचिन भोसले यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की उद्धव ठाकरेंविरोधात नेमकं कोण षडयंत्र रचतंय? त्यावर भोसले म्हणाले, “संपूर्ण राज्यात उद्धव ठाकरे यांची मोठी लोकप्रियता आहे. तसेच माझं स्पष्ट मत आहे की उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी किंवा ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिथे आमचे विजयी उमेदवार आहेत, जिथे आम्ही भक्कम आहोत, त्या जागा आम्हाला दिल्या जात नाहीत”. यावर भोसले यांना विचारण्यात आलं की तुमचा रोख शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे का? त्यावर भोसले म्हणाले, “हो! पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय होत आहे. ज्या जागा आम्ही जिंकू शकतो, त्या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हिसकावल्या आहेत”.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”
शिवसैनिक बंडखोरी करणार, उमेदवारही ठरला?
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) नेते व माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, “संधी मिळाल्यास मी स्वतः देखील येथून निवडणूक लढवू शकतो”. चाबुकस्वार यांनी २०१४ व २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. ते म्हणाले, “पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला मिळाल्या आहेत, मग आम्हाला काय मिळणार? आम्ही कोणाच्या जीवावर पुण्यात शिवसेना टिकवणार? शिवसेना कशी जिवंत राहणार? त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार येथे उभा राहिला तरी आम्ही त्याच्यासाठी काम करणार नाही. उलट एका मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा करण्याचा विचार करत आहोत सध्या आमचा उमेदवार ठरलेला नाही मात्र मी स्वतः निवडणूक लढवायला तयार आहे”.