पुणे : महाराष्ट्रात राजकीय पक्षांची आयपीएल करून ठेवली आहे. कोण कुठून खेळतो आहे हेच कळत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका केली. राजकारणात झालेला चिखल स्वच्छ करण्याची गरज आहे. ती संधी या निवडणुकीने दिली आहे. हेच लोक पुन्हा निवडून आल्यास आपण करतो ते बरोबर असा त्यांचा समज होईल. हा राजकीय खेळ थांबवला पाहिजे. एकदा मनसेला संधी देऊन बघा, अशी सादही त्यांनी घातली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे, अनिल शिदोरे या वेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की हडपसर मतदारसंघ २००९ मध्ये झाला. गावे महापालिकेत आली. मात्र, गावे होती तीच बरी होती, असे कित्येक लोक सांगतात. आज वाहतूक कोंडी प्रचंड आहे. शहराला काहीही आकार-उकार नाही. जनतेला काय हवे आहे, त्यानुसार विकास होतच नाही. पुण्याचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही, हे मी २५-३० वर्षे पुण्यात येऊन सांगत आहे. परदेशात लोकांचा विचार करून शहरे घडवली जातात. मात्र, आपल्याकडे केवळ ठेकेदारीतून टक्केवारी घेतली जाते. पुढील पिढ्यांना चांगले आयुष्य मिळाले पाहिजे हा विचार कोणी करत नाही. माझ्या हाती सत्ता दिल्यास पुन्हा याच माणसाला सत्ता द्यावी असे वाटेल, असे काम करून दाखवेन. महाराष्ट्राचा विकास आराखडा करणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे. मला मुख्यमंत्री पदाचा सोस नाही. छत्रपती शिवाजी महाराज, मराठेशाहीचे गतवैभव महाराष्ट्रात पुन्हा आणायचे आहे. तरुणांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे.
हेही वाचा >>> हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…
जातीपातीच्या खेळात महाराष्ट्राचा सत्यानाश झाला आहे. जातीपातींचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाले. अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जातीपातींचे राजकारण होत आहे. महापुरुष जातींमध्ये विभागले गेले आहेत. सिमी, आयसिसचे अतिरेकी हडपसरमधील मोहल्ल्यांत सापडले आहेत. रोजगार, नोकऱ्या नाहीत, शाळांमध्ये प्रवेश नाहीत, रुग्णालयात खाटा मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे जनतेसाठी जो रस्त्यावर उतरतो, त्याला मतदान करणे गरजेचे आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
आज तरुणांना नोकऱ्या नाहीत, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पालखी मार्गावर वारकरी भवन झाले पाहिजे. स्वतंत्र महापालिका झाली पाहिजे. समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. ही कामे विद्यमान आमदार सोडवू शकले नाहीत. मात्र आमदार म्हणून संधी मिळाल्यास सर्व कामे मार्गी लावणार आहे, असे बाबर यांनी सांगितले.