पिंपरी : माझा मूळ स्वभाव जागा करु नका. १३ दिवसांत निवडणूक होईल. माझ्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला, तर २० तारखेनंतर माझा स्वभाव बदलणार. मी ‘धारकरी’ आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. भोसरीत गुंडागर्दी, दडपशाही सुरू आहे. धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत असा इशाराही पवारांनी दिला. त्यामुळे आगामी काळात भोसरीतील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
विरोधकांनी आरोप करताना अक्षरशः पातळी सोडली आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाटते की मी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यावे. पण, मी पातळी सोडून बोलणार नाही. मी आरोपांना उत्तर देणार नाही माझ्याकडे पुरावे आहेत मी काम मांडत राहणार विरोधकांना त्यांचे उत्तर मिळेल. पण, माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देणार असेल, तर माझी विरोधकांना विनंती आहे की, माझा मूळ स्वभाव जागा करु नका. १३ दिवसांत निवडणूक होईल. माझ्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला, तर २० तारखेनंतर माझा स्वभाव बदलणार. माझ्या माता-भगिनी आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी ‘‘धारकरी’’ आहे, हे लक्षात ठेवा, असा गर्भीत इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला होता.
हेही वाचा >>> महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार
त्याला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.भोसरीत गुंडागर्दी, दडपशाही आहे. मतदारसंघात ताबा, मलिदा, रिंग गँग झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. व्यवसाय बंद केले जात आहेत. झेंडे, फलक काढले जातात. कार्यकर्त्यांना अडविले जाते. चेंबरपासून प्रत्येक कामात शहरात भ्रष्टाचार झाला आहे. महेश लांडगे स्वतःला वारकरी म्हणता तर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. तेव्हा त्यांना विरोध करण्याची हिम्मत लांडगे यांच्यात होती का? आमदार लांडगे हे दमदाटीशिवाय काहीच बोलले जात नाही. अहंकार आणि पैशाची मस्ती आहे. भाजपने महापालिका वाटून घेतली आहे. भाजपचा विकास म्हणजे नेत्यांचा विकास आहे. आम्हाला धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत. परिवर्तन करायचे हे भोसरीतील नागरिकांचे ठरलेले आहे. लोकांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचे मत आले की येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते. फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना मदत करून ठेके मिळवायचे, त्यातून पैसा मिळवायचा एवढेच कुठेतरी चालू आहे. त्यामुळे परिवर्तन हे नागरिकांनी ठरवले आहे. एकाधिकारशाही मुळापासून संपवायची आहे. .