पुण्यात काही वाद हे पूर्वीपासून चालत आले आहेत. त्यांपैकी ‘पूर्व पुणे’ आणि ‘पश्चिम पुणे’ हा वाद तर अगदी जुनाच. पश्चिम पुण्याचे पुढारी पूर्व पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोणतीही नवीन योजना आली, की पहिल्यांदा ती पश्चिमेकडे राबवली जाते. त्यामुळे पूर्व पुण्याच्या विकासाला बाधा येत असल्याचा आरोप कायम केला जातो. आता मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेला पूर्व भाग आणि त्यातून उदयाला येणाऱ्या नवीन नेतृत्वामुळे कोणत्या भागाचे नेतृत्व वरचढ, हा प्रश्न उभा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत पूर्व पुणे कोणाला साथ देणार, यावर पुण्याचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात पूर्व पुणे आणि पश्चिम पुणे हा वाद परंपरेने कायम सुरू असतो. नगरपालिका असल्यापासून हा वाद कायम चर्चेत राहिला आहे. पश्चिमेकडे शिक्षणसंस्था, नगर नियोजन योजना आणि चकाचक रस्ते; पण पूर्वेकडे या सुविधांचा अभाव असल्याची नाराजी पूर्व भागातील राजकीय नेते कायम व्यक्त करत आले आहेत. पश्चिमेकडे सुविधाच सुविधा, तर पूर्व भागात नागझरी नाला. त्याची स्थिती त्या वेळी दयनीय होती. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असायचे. मात्र, या भागात ससून हॉस्पिटल, के. ई. एम. हॉस्पिटल, ताराचंद हॉस्पिटल ही पूर्वीपासून आहेत. तत्कालीन नगरपालिकेचे बरेचसे दवाखानेही पूर्व भागामध्येच होते. व्यापारी पेठा पूर्वेकडे होत्या. राजकीयदृष्ट्या नगरपालिकेतील निम्मे सभासद पूर्व भागातून निवडून येत असत. त्या दृष्टीने त्यांचे नगरपालिकेत बहुमत असले, तरी त्यांच्यात एकमत होत नसे. त्यामुळे पूर्व भागात कोणतीही योजना लवकर येत नसल्याने हा भाग विकासापासून पश्चिम भागाच्या तुलनेत मागे पडला.

हेही वाचा >>> पुण्यात या दिवशी होणार ‘राज गर्जना ‘

पुणे महापालिका स्थापन झाल्यावरही हे चित्र बदललेले दिसत नाही. पूर्व पुणे आणि पश्चिम पुणे हा वादाचा विषय सुरूच राहिला. महापालिकेत कोणतीही नवीन योजना आली, की त्यावरून पूर्व पुण्याचे नगरसेवक आक्रमक होताना आजही दिसतात. विशेषत: पाण्याचा विषय निघाला, की पूर्व पुण्याचे नगरसेवक हे या विषयावर का होईना एकत्र येऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधत आले आहेत.

पुण्याच्या पूर्व भागात हडपसर, वडगाव शेरी, तसेच पुणे कॅन्टोन्मेट मतदारसंघाचा काही भाग येतो. अन्य मतदारसंघ हे पुण्याच्या पश्चिमेकडील भागाशी संलग्न समजले जातात. पूर्व भागातील हडपसर आणि वडगाव शेरी हे मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असणारे आहेत, तर पश्चिमेकडील मतदार हे भाजपचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यावर पूर्व भागाचे वर्चस्व राहणार, की पश्चिमेच्या हातात परंपरेने नेतृत्वाची धुरा कायम राहणार, हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे.

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका, म्हणाले, निवडणुकीतून..!

पुण्याच्या पूर्व भागातील गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर हा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे. साडेसतरा नळी, मुंढवा, केशवनगर, महंमदवाडी, वडगाव शेरी, विश्रांतवाडी या भागाचा कायापालट झाल्याने विकासाबाबतीत पूर्व आणि पश्चिम पुण्यातील असमतोल कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, या भागावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. सध्या हडपसर आणि वडगाव शेरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत रार्ष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अनुक्रमे चेतन तुपे आणि सुनील टिंगरे हे आमदार आहेत. या निवडणुकीत दोन्ही जागा राखण्याचे आव्हान अजित पवार यांच्यापुढे आहे.

कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, कसबा, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजपपुढे आव्हान असणार आहे. भाजपला या ठिकाणी यश मिळाल्यास पुण्याचे नेतृत्व हे भाजपच्या ताब्यात राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुण्याचे नेतृत्व पूर्व पुण्याच्या की पश्चिम पुण्याच्या हाती, हा प्रश्न निकाली लागणार आहे. मात्र, पूर्व पुणे आणि पश्चिम पुणे हा परंपरेने चालत असलेला वाद कायम राहणार आहे.

sujit.tambade@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 west pune vs east pune east pune and west pune dispute over development pune print news spt 17 zws