पुणे : मतदानाच्या दिवशी शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील ६०० पोलीस अधिकारी, सहा हजार ८०० पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे एक हजार ७५० जवान बंदोबस्तास तैनात राहणार आहेत. पाेलीस कर्मचाऱ्यांसह संवेदनशील मतदान केंद्रात राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या (सीआरपीएफ) तैनात राहणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी शहर, तसेच उपनगरांत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मतदान प्रकियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

हेही वाचा : Pune Accident: मद्याच्या नशेत मोटार चालवून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलाने तीन वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू

u

शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. राज्य राखीव पोलीस दल, तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या संवेदनशील मतदान केंद्राच्या परिसरात तैनात केल्या जाणार आहेत. शहरात एखादी अनुचित घटना घडल्यास शीघ्र कृती दलाचे पथके पाच ते दहा मिनिटांत घटनास्थळी पोहचतील, असे त्यांनी सांगितले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, आतापर्यंत एक हजार ७०० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेची पथके मतदानाच्या दिवशी गस्त घालणार आहेत. अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके शहरातील वेगवेगळ्या भागांत गस्त घालणार आहेत.

दृष्टिक्षेपात बंदोबस्त

  • ११ पोलीस उपायुक्त, २२ सहायक आयुक्त
  • ६४ पोलीस निरीक्षक, ३११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक
  • सहा हजार ८०० पोलीस कर्मचारी
  • गृहरक्षक दलाचे एक हजार ७०० जवान
  • सुरक्षा दलाच्या १७ तुकड्या
  • शीघ्र कृती दल, घातपात विरोधी पथके तैनात
  • संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त
  • गुन्हे शाखेच्या ४० पथकांकडून गस्त

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगट यांनी केले ‘ हे ‘ आवाहन !

जिल्ह्यात कडक बंदोबस्त

पुणे जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे, तसेच अनुचित घटना घडल्यास त्वरित घटनास्थळी पोहचणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. पुणे जिल्ह्यात दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नऊ उपविभागीय अधिकारी, ३५ पोलीस निरीक्षक, २८७ उपनिरीक्षक, तीन हजार २४६ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार ६०० जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या ११ तुकड्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 security tightened in pune for polling day pune print news rbk 25 css