पुणे : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक होणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढून लोकांना एक चांगला पर्याय दिला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की जागावाटपाबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो. ४८ जागांवर लढून ३१ जागांवर आम्हाला यश मिळाले. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. आता तसेच विधानसभा निवडणुकीमध्येही करावे लागेल. आम्ही एकत्र लढून लोकांना एक चांगला पर्याय देऊ आणि महाराष्ट्रात परिवर्तन आणण्यात यशस्वी ठरू, अशी लोकांची आमच्याकडून अपेक्षा आहे.
हेही वाचा : काँग्रेस भवनात झाडाझडती, हाणामारी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी हे बैठकीत चर्चा करून धोरण ठरवणार आहेत. आमची तिघांची एकत्रित काम करण्याची मानसिकता असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : महिलांची संख्या वाढल्यास संसदीय संस्थांमध्ये सुधारणा, शरद पवार यांचे मत
‘बदलाची अपेक्षा नाही’
लोकसभा अध्यक्ष हे पद सत्ताधारी पक्षाला मिळते, तर लोकसभा उपाध्यक्ष हे पद विरोधी पक्षाला मिळण्याचा संकेत आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात तसे काही घडलेले नाही. त्यामुळे आता त्यात काही बदल होण्याची अपेक्षा नाही, अशी टिप्पणी पवार यांनी केली.