पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या गाड्यांचे वेळापत्रक मार्च महिन्यापर्यंत पुन्हा पुढे ढकलले आहे. याबाबत रेल्वेच्या ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आयआरसीटीसी) अतिरिक्त रेल्वे गाड्या उपलब्ध होऊ शकत नसल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविण्यात आले आहे.

आतापर्यंत नऊ रेल्वे गाड्या विविध तीर्थक्षेत्रांसाठी सोडण्यात आल्या होत्या. मात्र, पुढे ढकलण्यात आलेल्या १३ गाड्या अयोध्येसाठी असल्याने ज्येष्ठांना अयोध्येला जाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वी समाजकल्याण विभागाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू झाल्याने या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले होते. लाभार्थी संख्या आणि जिल्हानिहाय यात्रांचे नियोजनानुसार ‘आयआरसीटीसी’कडून १५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, यापैकी १३ रेल्वे गाड्या अयोध्येसाठी होत्या.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यानिमित्त उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची आरक्षण मर्यादा पूर्ण क्षमतेने झाली आहे. रेल्वे मंत्रालयाकडूनही महाराष्ट्रातून प्रयागराज येथे जाण्यासाठी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वे गाड्यांना गर्दी असल्याने रेल्वे विभागाच्या ‘आयआरसीटीसी’कडून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतील प्रवाशांना गाड्या उपलब्ध नसल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता प्रतीक्षा करण्यात येत आहे. अर्जदारांना समाजकल्याण विभागाकडून तसे सूचित करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

राज्य़ सरकारतर्फे ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी २४ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एक हजार लाभार्थींची निवड करण्यात येत असून चारधाम, वैष्णोदेवी, अमरनाथ, अयोध्या अशी विविध तीर्थक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. आतापर्यंत नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यानुसार कोल्हापूर, जळगाव, मुंबई शहर, ठाणे, मुंबई उपनगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, पुणे, नागपूर आणि लातूर या जिल्ह्यांमधील साडेसात हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना तीर्थक्षेत्र दर्शन घडवून आणण्यात आले आहे.

प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या महाकुंभ मेळ्यानिमित्त रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे सध्या रेल्वे गाड्यांचे नियोजन होऊ शकत नसल्याने नियोजित गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. साधारणत: मार्च महिन्यानंतर गर्दी ओसरल्यावर तीर्थक्षेत्र योजनेंतर्गत रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्यात य़ेईल.- गुरुराज सोन्ना, विभागीय व्यवस्थापक, आयआरसीटीसी, पुणे

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील सहा हजारांहून अधिक लाभार्थ्यांना तीर्थ दर्शन घडवून आणण्यात आले आहे. इतर लाभार्थ्यांच्या नियोजनानुसार अनेक जिल्ह्यांमधून अयोध्येतील श्रीराम मंदिर येथे नेण्यासाठी रेल्वेच्या फेऱ्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, प्रयागराज येथील महाकुंभमेळा सुरू असल्याने गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात येत असल्याचे पत्र ‘आयआरसीटीसी’कडून प्राप्त झाल्याने नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे. – स्वाती इथापे, समाजकल्याण उपायुक्त

Story img Loader